स्वाती घोसाळकर

मुंबई  : नाशिक लोकसभा मतदार संघात आज नाट्यमय घडामोडीत राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी माघार घेतलीय. जितक्या आश्चर्यकारकरित्या त्यांचे नाव शर्यतीत आले तितक्याच आश्चर्यकारकरित्या त्यांनी आज माघारही घेतलीय. सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेवर दावा सांगण्यासाठी भाजपाने ही राजकीय खेळी खेळल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. काल उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन रत्नागिरी सिंधुदर्ग लोकसभा मतदार संघातून माघार घेत असल्याचे जाहिर करताच लगोलग भाजपाने नारायण राणे यांची उमेदवारी जाहिर केली होती. रत्नागिर सिंधुदुर्ग मतदार संघ निर्माण झाल्यानंतर यंदा प्रथमच तेथे धनुष्यबाण हे चिन्ह नसणार आहे. दरम्यान आज भुजबळांनी माघार घेऊनही सायंकाळी उशीरारपर्यंत विजयाची हॅट्ट्रीक करण्याच्या तयारीत असणाऱ्या हेमंत गोडसेंचे नाव शिंदेच्या शिवसेनेकडून जाहिर करण्यात आले नव्हते.

राष्ट्रवादीने या जागेचा दावा सोडल्याने शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना येथून संधी मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांचे नाव नाशिकसाठी भाजपाकडून पुढे केले गेल्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे कमालीचे नाराज झाले होते. त्यांनी यासंदर्भात अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजारो कार्यकर्त्यांसह ठाण्यात भेट घेवून नाशिकचा आग्रह कायम ठेवला. ‘धनुष्यबाण रामाचा हेमंत अप्पा कामाचा’ अशा घोषणांनी अवघे ठाणे दणाणून गेले होते. या पार्श्वभुमीवर आज पत्रकार परिषद घेवून छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेत असल्याची घोषणा केल्याने गोडसे गटाला हायसे वाटले असेल.

भुजबळ यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला असला तरी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत नसल्याने भुजबळ नाराज होते.तीन आठवड्याचा वेळ होऊन उमेदवारी जाहीर झाली नाही.नाशिकची उमेदवारी जाहीर करायला अधिक उशीर होत असल्याने महायुतीचे नुकसान होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांच्या मनातील संदिग्धता दूर करण्यासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सुचवले होते.त्यांनी केलेल्या आग्रहाबद्दल भुजबळ यांनी यावेळी आभार मानले.भुजबळ यांच्या माघारीमुळे येथून शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *