आरोग्य हा मूलभूत हक्क मान्य न केल्यास महाराष्ट्रात जनआंदोलन – अशोक जाधव
रमेश औताडे
मुंबई: राज्यात आरोग्य सेवा कोलमडली असून खासगीकरणामुळे सामान्य नागरिकांना उपचारांसाठी प्रचंड आर्थिक भार सहन करावा लागत आहे. गरीब, कष्टकरी, कामगार वर्गाला वेळेवर व परवडणारी आरोग्यसेवा मिळत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य हा मूलभूत हक्क म्हणून सरकारने मान्य करावा, या मागणीसाठी महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा म्युनिसिपल मजूर युनियन, मुंबईचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे.
२०२०–२१ या काळात आरोग्य सेवेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात आजही शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा, मनुष्यबळ आणि औषधांचा अभाव आहे. खासगी रुग्णालयांमधील अवाजवी दरांमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः उध्वस्त होत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा ही केवळ बाजारपेठेच्या हाती न देता सरकारने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आरोग्य सेवा सर्वसामान्यांसाठी मोफत व सर्वसमावेशक असावी, शासकीय रुग्णालये बळकट करावीत, कंत्राटी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, तसेच आरोग्य क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवावा, या प्रमुख मागण्या युनियनने मांडल्या आहेत.
या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर कामगार, कर्मचारी व नागरिकांना सोबत घेऊन राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही म्युनिसिपल मजूर युनियनने दिला आहे.
