भाजपाच्या आसावरती पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत

बोरीवली पूर्वेच्या प्रभाग क्र. १३ मधील भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई महिला अध्यक्ष राखी जाधव भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरद पवार गट) मुंबई महिला अध्यक्ष, माजी नगरसेविका राखी जाधव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

निष्ठेचे फळ…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निर्मितीपासून राज ठाकरेंसोबत निष्ठेने राहणाऱ्या मनसेचे मुंबई उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज घोषित केली.

भाजपात नारजीनंतरची घोषणाबाजी

धारावीच्या वॉर्ड १८५ मध्ये स्थानिक नेते रमेश नाडर यांना तिकीट नाकारल्यानंतर नाडर यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क पक्षाच्या कार्यालयातच घोषणाबाजी केली.

स्वाती घोसाळकर

मुंबई : राज्यातील २९ महानगर पालिकेच्या निवडणूकांसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस शिल्लक असतानाच राज्यातील सर्वच पक्षात सत्तेसाठी फाटाफूट आणि ताटातूट पहायला मिळाली. काहींच्या डोळ्यात आनंदाचे तर काहींच्या डोळ्यात दुखाचे अश्रु होते. निष्ठा, विष्ठा, गद्दार, बंडखोर अशा शब्दांची मुक्तहस्ते उधळण आज दिवसभर सर्वच पक्षात पहायला मिळाली. फाटाफुटीचा हा ताण प्रत्येक पक्षावर इतका होता की विरोधातील जाऊदे पण सत्तेत असलेल्या भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही आपल्या अंतिम याद्या अजून जाहिर करता आलेल्या नाहीत. याद्या जाहीर न करताच संबधित उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत आहेत.

मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीसाठी शेवटचे वृत्त हाती आले तोवर तब्बल १०२ एबी फॉर्म वाटले होते. बहुतांष ठिकाणी विद्यामान माजी नगरसेवकांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपाच्या बोरीवली पूर्वेच्या प्रभाग क्र. १३ मधील माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. भाजपाला हा धक्का मानला जात आहे.

दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील मुंबई महानगरपालिकेसाठी एबी फॉर्मचे वाटप सुरु केले आहे. मुंबईत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म देण्यात आला. स्वत: राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांना एबी फॉर्म दिला. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर देखील उपस्थित होते. वॉर्ड क्रमांक १९२ मधून यशवंत किल्लेदार उमेदवारी दाखल करणार आहेत. राज ठाकरेंकडून एबी फॉर्म मिळताच यशवंत किल्लेदार भावूक झाले. माझ्यासाठी भावनिक आणि आनंद गोष्ट आहे. भावनिक झालो आहे, कंठ दाटून आला आहे, असं यशवंत किल्लेदारांनी सांगितले. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही पोचपावती मिळाली, असंही यशवंत किल्लेदार म्हणाले. दरम्यान, १९२ ची जागा मनसेला सुटल्याने ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार प्रकाश पाटणकर नाराज झाले होते. त्यानंतर आज मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रकाश पाटणकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीमध्ये बंडखोरीचा प्रचंड फटका बसण्याची शक्यता आहे.

पुण्यात काँग्रेस-ठाकरेंच्या शिवसेनेची युती

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटाने युतीची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पुण्यात सोमवारी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. त्यानुसार काँग्रेस आणि ठाकरे गट पुण्यात एकत्र निवडणूक लढणार आहेत. १६५ नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालिकेत काँग्रेस ६० आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ४५ जागा लढवणार आहे. उर्वरित जागांबाबत पुन्हा चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. पुण्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांच्या मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान २०१७ साली पुण्यात झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने ९७ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने ३९, काँग्रेसने ९, शिवसेना (एकत्रित)  १० आणि मनसेने २ जागा जिंकल्या होत्या.

पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी तळवडे येथे केली. याच ठिकाणाहून त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत आगामी निवडणुकीत शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडनंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर यावर एकमत झाले असून आज दुपारी याबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाणार आहे. अजितदादांना १२५शरद पवार गट ४० जागा लढवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *