केडीएमसी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची उडाली झुंबड
उमेदवारी अर्ज भरण्याच्या विहित वेळेच्या नंतरही अर्ज भरण्यासाठी गर्दी
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पालिकेच्या नऊ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांची झुंबड केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या इच्युक उमेदवारांना निवडणूक निर्णय कार्यालयात प्रवेश दिल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा पर्यंत सर्वच निवडणूक निर्णयात सुरू होती.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या ३१ पॅनल मधील १२२ जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मंगळवारी अखेरच्या दिवशी सकाळी नऊ वाजल्या पासून इच्छुक उमेदवारांनी आपल्या निवासस्थाना पासून वाजत गाजत आपल्या शेकडो समर्थकांसह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. सकाळ पासूनच पालिकेच्या वॉर्ड ऑफिस असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केल्याने प्रभाग क्षेत्र कार्यालयाचा परिसर सर्वच राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार त्यांचे समर्थक, पक्षाचे झेंडे, पक्षाच्या घोषणाबाजींनी फुलून गेला होता.
पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्ष, भाजपा, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस (आय) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी व अपक्ष आदी पक्षातून निवडणूक लढविणाऱ्या जवळ पास साडे पाचशे ते सहाशे इच्युक उमेदवारांनी पालिकेच्या कल्याण डोंबिवली,आंबिवली शहरातील विविध नऊ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणा पर्यंत इच्छुक उमेदवारांना निवडणूक निर्णय कार्यालयात प्रवेश दिल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा पर्यंत सर्वच निवडणूक निर्णय कार्यालयात सुरू होती.
