अमर हिंद मंडळाची “स्व. उमेश शेनॉय चषक” राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
विजय क्लब श्री स्वामी समर्थ मंडळ यांची बरोबरी.
मुंबई:- सिद्धार्थ मंडळ, संघर्ष मंडळ, डॉन बॉस्को यांनी अमरहिंद मंडळ आयोजित “स्व. उमेश शेनॉय चषक” राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. विजय क्लब विरुद्ध श्री स्वामी समर्थ हा सामना बरोबरीत सुटला. तर गुड मॉर्निंग स्पोर्टस् ने पहिल्याच दिवशी दोन विजय मिळवीत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. मुंबईतील दादर (प.)येथील मंडळाच्या पटांगणावर पहिल्या दिवशी झालेल्या ड गटातील चुरशीच्या सामन्यात मुंबई शहरच्या विजय क्लबने ठाण्याच्या श्री स्वामी समर्थ मंडळा ३६-३६ असे बरोबरीत रोखले. राजेश गुप्ता, अमेय खांडेकर, शिवम यादव यांनी विजय कडून, तर विवेक शिंदे, रमेश विश्वकर्मा श्री स्वामी समर्थ कडून उत्कृष्ट खेळले. फ गटात ठाण्याच्या डॉन बॉस्कोने जिनसिंग, मयुरेश वाघ, राज सोनावणे, ध्रुव लोखंडे यांच्या चढाई पकडीच्या सर्वोत्तम खेळाच्या जोरावर मुंबई शहरच्या आकांक्षा मंडळावर ४७-२९ अशी सहज मात करीत साखळीत पहिल्या विजयाची नोंद केली. आकांक्षाचे साहिल मिसाळ, नूरलम शेख यांचा आज प्रभाव पडला नाही.
मुंबई शहरच्या गुड मॉर्निंग स्पोर्टस् ने क गटात गटात आज सलग २ विजय मिळविले. प्रथम त्यांनी उपनगरच्या श्री सिद्धिविनायक मंडळाला ३५-३० असे तर त्यानंतर झालेल्या सामन्यात मुंबई शहरच्या गोल्फदेवीला ४८-४० असे पराभूत करीत बाद फेरी गाठली. विवेक गवळी, आयुष पवार, दिवेश गवळी, विनय बंबोरे यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाने ही किमया साधली. रत्नागिरीच्या संघर्ष मंडळाने ड गटात पालघरच्या इच्छाशक्ती मंडळाला ४५-३४ असे नमविले. शैलेश रोडगे, रोशन चिपळूणकर, शुभम नवरंग यांच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. आदित्य मोरया, राज सिंग यांचा खेळ इच्छाशक्तीचा पराभव टाळण्यात कमी पडला. उपनगरच्या सिद्धार्थ मंडळाने ब गटात मुंबई शहरच्या नवोदित मंडळाला ५३-५२ असे चकवीत आगेकूच केली. नरेश चव्हाण, संकेत यादव अमरराज यांनी सिद्धार्थ कडून, तर अर्जुन कोकर, रजत मुलाणी यांनी नवोदित कडून उत्तम खेळ केला. अलोक दिवेदी, निलेश सिन्हा, शिरीष माऊली, विक्रम महापात्रा, संजय तिवारी, विजयकुमार पाल आदी मान्यवाराच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
