मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व ५३ उमेदवारांना विजयाचा राजमंत्र दिला. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीत मनसेच्या वाट्याला ५३ जागा आलेल्या आहेत. आज या सर्व उमेदवारांनी राज ठाकरे यांची शिवाजीपार्क येथे शिवतिर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी उमेदवारांना राजमंत दिला, “मुंबई मराठी माणसाची आहे. ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे. आता पराक्रमाची पराकाष्ठा करा,” असा स्पष्ट संदेश दिला आहे.
राज ठाकरे यांनी उमेदवारांशी बोलताना म्हटले की, “तुम्हाला अनेक ऑफर येतील. पैशांची आमिष दाखवली जातील. मात्र कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.” स्वतःचा अनुभव सांगताना त्यांनी म्हटले, “मलाही खूप ऑफर आल्या होत्या, पण मी सगळ्यांना पळवून लावलं,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी उमेदवारांना बजावले.
बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकावून काढा
मुंबई मराठी माणसाची आहे. आपल्याकडे ही शेवटची संधी आहे. प्रत्येक बूथला आपली १० लोकं उभी करा. बोगस मतदान झाले नाही पाहिजे, यासाठी तुम्ही सतर्क राहा. जर बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकावून काढा, असा आदेश देखील राज ठाकरे यांनी उमेदवारांना दिला आहे.
