यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या
हरिभाऊ लाखे
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनामार्फत नवोदित कवींंकडून सन २०२५ च्या विशाखा काव्य पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यानुसार इच्छुक कवींनी सन २०२५ मध्ये प्रकाशित झालेला आपला पहिला मराठी काव्यसंग्रह येत्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत विद्यापीठात ‘प्रमुख – कुसुमाग्रज अध्यासन’ या पत्त्यावर केवळ टपालाद्वारे पाठवावा, असे आवाहन कुसुमाग्रज अध्यासनातर्फे करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नावाने स्थापित अध्यासनामार्फत, त्यांच्या सुप्रसिद्ध ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या नावाने नवोदित कवींच्या मराठी भाषेतील प्रथम काव्यसंग्रहास दरवर्षी पुरस्कार दिला जातो. यंदा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्काराची नियमावली निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहांमधून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. सादर करण्यात येणारा काव्यसंग्रह केवळ मराठी भाषेतील असावा व त्यावर प्रकाशन वर्ष ठळकपणे मुद्रित केलेले असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित काव्यसंग्रहाची यापूर्वी कोणतीही ई-आवृत्ती प्रकाशित झालेली नसावी. पुरस्कारासाठी कवी स्वतः किंवा संबंधित प्रकाशक अर्ज पाठवू शकतात.
अर्जासोबत काव्यसंग्रहाच्या पाच प्रती, कवीची पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे, सविस्तर परिचयपत्र तसेच हा काव्यसंग्रह कवीचा प्रथमच प्रकाशित झालेला असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. प्रतिज्ञापत्र संलग्न नसल्यास संबंधित काव्यसंग्रह पुरस्कारासाठी विचारात घेतला जाणार नाही. प्रतिज्ञापत्राचा नमुना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परिचयपत्रामध्ये कवीचा संपूर्ण पत्ता, ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद केलेला असावा.
काव्यसंग्रह केवळ टपालाद्वारेच पाठवावेत. खाजगी कुरीयर सेवेद्वारे पाठविलेले काव्यसंग्रह स्वीकारले जाणार नाहीत. पाकीटावर ‘विशाखा काव्य पुरस्कारासाठी’ असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. या पुरस्कारासंबंधी विद्यापीठ व निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
या पुरस्कारासाठी पात्र व इच्छुक कवींनी आपला काव्यसंग्रह ३१ जानेवारी २०२६ पर्यंत प्रमुख, कुसुमाग्रज अध्यासन, ज्ञान स्रोत केंद्र इमारत, पहिला मजला, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, गोवर्धन, नाशिक – ४२२२२२ या पत्त्यावर केवळ टपालाद्वारे पाठवावा.
अधिक माहिती व सविस्तर नियमावलीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे व कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले आहे.
०००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *