जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पर्यावरण दक्षता मंडळाच्या
ठाणे : “पर्यावरण दक्षता मंडळ” ही संस्था गेली २६ वर्षे पर्यावरण शिक्षण, संवर्धन व जनजागृती या क्षेत्रात ठाणे व जवळपासच्या परिसरांत कार्यरत आहे. संस्थेच्या ‘आपलं पर्यावरण’ – पर्यावरण शिक्षण घरोघरी या मासिकांतर्गत गेली ४ वर्षे पर्यावरणीय दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. २०२६ची दिनदर्शिका भारताच्या अप्रतिम, वैविध्यपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वनसंपत्तीविषयी आहे. “आपलं पर्यावरण दिनदर्शिका २०२६” चे प्रकाशन गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी “आपलं पर्यावरण” मासिकाचे संपादक प्रा.विद्याधर वालावलकर व कार्यकारी संपादक सुरभी ठोसर हे उपस्थित होते.
पर्यावरण दक्षता मंडळाच्या देवराई, निसर्गायण मामणोली, निसर्गायण टिटवाळा तसेच ग्रीन शॉपी या प्रकल्पांविषयीही यावेळी चर्चा झाली. ही दिनदर्शिका केवळ तारखांची मांडणी नाही, ती आपल्या देशातील अविश्वसनीय जंगलांचा, तेथील जैवविविधतेचा आणि पृथ्वीच्या भविष्यात त्यांच्या निर्णायक भूमिकेचा अनुभव देणारी एक जिवंत सफर आहे. प्रत्येक महिन्यावर एक नवा प्रदेश, एक नवा रंग, एक नवी कथा आहे. निसर्गाची भाषा समजून घेण्यासाठी, जंगलांशी नाते बांधण्यासाठी आणि पर्यावरण जागरूकतेची नवी दृष्टी देण्यासाठी ही दिनदर्शिका तुमची साथीदार ठरेल. तुम्ही एक प्रत घरी ठेवा, तुमच्या प्रिय व्यक्तींना भेट द्या किंवा शाळा-महाविद्यालयांना दान करून विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाबद्दलची संवेदना रुजवा, असे आवाहन पर्यावरण दक्षता मंडळाने यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *