मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही घीसीपीटी कॅसेट
शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
सातारा : मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही उद्धव ठाकरेंची दरवेळचीच घीसीपीटी कॅसेट आहे. आम्हाला महाराष्ट्र फास्ट तर मुंबई सुपरफास्ट करायची आहे. आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो,’ अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
दरे, ता. महाबळेश्वर या आपल्या गावी आल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘मुंबईचा सर्व विकास महायुती सरकारने केला. मुंबईची जनता सुज्ञ असून, कामाला महत्त्व देणारी आहे. भावनेचं राजकारण नको. लोकांना विकासाचा राजकारण पाहिजे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा शिंदेसेना आणि एकनाथ शिंदे ठाण्यापुरते आहेत असे म्हणायचे; पण आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी ते चांदा ते बांदापर्यंत आहेत, हे दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे हे राज्यात फिरले नाहीत. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. म्हणून त्यांची परिस्थिती काय झाली ते आपण पाहिलंय. मला त्यांच्यावर बोलायचं नाही मी कामाने उत्तर देत असतो.
नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत आम्ही मैत्रिपूर्ण लढत आहोत. तिथे शिंदेसेनेची मोठी ताकद आहे. या ठिकाणी शिंदेसेनेला मोठे यश मिळेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कामाच्या जोरावर महायुतीचाच झेंडा फडकेल. महायुतीचाच महापौर होणार आहे, असा दावाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
