ठाणे महापालिका निवडणुकीच्या कामाकरिता परिवहन सेवेच्या २७५ बसेस तैनात
ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची मतदान प्रक्रिया बुधवार, १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे परिवहन सेवेच्या मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत. दिनांक १४ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत परिवहन सेवेच्या सुमारे ७५ टक्के बसेस निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परिणामी, ठाणे शहरात दोन दिवस बससेवा मर्यादित राहणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी नमूद केले.
निवडणूक प्रक्रियेसाठी १४ जानेवारी व १५ जानेवारीला २७५ बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळपासून दुपारी ३.०० वाजेपर्यत व दिनांक १५ जानेवारीला सायंकाळी ४.०० नंतर फक्त ८० ते ८५ बसेस शहरातील विविध मार्गावर चालविण्यात येणार आहे. परिवहन बसेसची वाहतूक प्रत्येक मार्गांवर तुरळक प्रमाणात सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रवाश्यांनी इतर पर्यायी वाहतुकीचा अवलंब करुन परिवहन सेवेस सहकार्य करावे असे आवाहन परिवहनच्या वतीने करण्यात आले आहे.
