ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयामार्फत स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात ठाणे शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत असून चिखलवाडी, भास्कर कॉलनी येथे मतदान जनजागृतीसाठी श्री स्वामी समर्थ व हिरकणी महिला बचतगटांच्या सदस्यांची एकत्रित बैठक घेऊन आवाहन करण्यात आले. महिला बचत गटांच्या माध्यमातून मतदार जनजागृती उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.
बचतगटातील महिलांना मतदानाचे महत्व समजावे आणि त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी ‘मतदान अमूल्य दान’ या संकल्पनेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या परिसरातील महिलांना ‘मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार’ अशी सामूहिक शपथ देण्यात आली. बचतगटांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी, कशी वाढवता येईल या विषयावर चर्चासत्र आयोजित करून मतदान जनजागृती करण्यात आली.
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना व राहत असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहनही बचत गटातील महिला सदस्यांना करण्यात आले.
या मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या नेतृत्वाखाली स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्यासह टीम उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत.
