नवी मुंबई : कोट्यवधी खर्च करून तयार केलेल्या सानपाडा सेक्टर १० येथील ‘संवेदना’ उद्यानाची दुरवस्था झाल्यामुळे दिव्यांगांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी निवेदन दिले.
उद्यानांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सानपाडा सेक्टर १० येथे ‘संवेदना’ उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. स्पर्शज्ञान, सुगंध, जाणीव, ध्वनी, चव या मानवाच्या पंचेंद्रियांवर आधारित संकल्पनेवर संवेदना उद्यान विकसित करण्यात आले असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. उद्यानांमध्ये दिव्यांग मुलांसाठी खेळणी, व्हीलचेअरचा झोपाळा, वाळूचा हौद, बोगदा, लेस बांधण्यासाठी बूट, वेगवेगळ्या प्रकारची हिरवळ, दगड, लाकूड, लादी, गोटे बसविलेला मार्ग, सापशिडीचा खेळ, स्पिकिंग ट्यूब, बेल ट्री, फुली गोळ्याचा खेळ, सेल्फी फ्रेम, बुद्धिबळ चौकटी, सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक इत्यादी सुविधांचा समावेश असून विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा व लहान मुलांसाठी विविध खेळणी बसविण्यात आली असून विशेष सुविधेसह दोन स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आली आहेत.
सौंदर्याला बाधा
उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिका अधिकारी, ठेकेदार यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने उद्यानाच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. उद्यानातील लोखंडी फलक, लहान मुलांची तुटलेली खेळणी उद्यानात पडलेली दिसत आहेत. तसेच कारंजे बंद पडले असून पाण्याचे हौद पाण्याअभावी ओस पडले असून झाडेही सुकून गेली आहेत. विद्युत दिवेसुद्धा तुटले असून त्यांचा खच एका कोपऱ्यात पडलेला आहे. स्वच्छतागृहातील नळ खराब झाले असून शौचास बसण्यासाठी असलेले भांडेसुद्धा तुटून पडले आहे. पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीमुळे उद्यानाचे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उद्यानात सकाळ, संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
कोट
सानपाडा येथील संवेदना उद्यानातील दुरुस्ती करण्याबाबत शहर अभियंता यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे जी काही कामे आहेत ती अभियांत्रिकी विभागाकडून केली जातील.
– दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग
