नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा २०२५–२६’ तसेच दिपावली उत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ यांचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह येथे करण्यात आले आहे.
पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्तता व सामाजिक जनजागृती या उद्दिष्टांना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेने सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेची त्रिस्तरीय मूल्यांकन प्रक्रिया :
१. प्राथमिक मूल्यांकन (Primary Assessment):स्पर्धेसाठी एकूण १७२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदविला. प्राथमिक मूल्यांकन समितीने सर्व १७२ मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. निर्धारित निकषांच्या आधारे टॉप ३० मंडळांची निवड करण्यात आली.
२. क्षेत्रीय मूल्यांकन (Field Assessment):प्राथमिक फेरीत निवडलेल्या ३० मंडळांचे सखोल क्षेत्रीय मूल्यांकन ३ परीक्षकांच्या पॅनेलमार्फत करण्यात आले. या टप्प्यात पर्यावरणपूरक सजावट, प्लास्टिकमुक्तता, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत उपक्रम, सामाजिक संदेश आणि नाविन्यपूर्ण संकल्पना यांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे टॉप २० मंडळांची निवड करण्यात आली.
३. अंतिम डेस्क मूल्यांकन (Desk Assessment):क्षेत्रीय मूल्यांकनातून निवडलेल्या २० मंडळांचे अंतिम डेस्क मूल्यांकन ७ परीक्षकांच्या पॅनेलमार्फत करण्यात आले. या पॅनेलचे अध्यक्षस्थान महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी भूषविले. सादर केलेले अहवाल, छायाचित्रे, व्हिडिओ पुरावे, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि पर्यावरणीय परिणामकारकता यांचा सखोल विचार करण्यात आला.
सर्व मूल्यांकन प्रक्रियेअंती उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १० अंतिम विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात आली आहे. या विजेत्या मंडळांचे पारितोषिक वितरण गुरुवार २६ फेब्रुवारी, दुपारी २.०० वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह येथे मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तसेच, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा दुर्गांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमास अनुसरून, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेस शालेय गटातून ३६ व खुल्या गटातून २० असे एकूण ५६ प्रवेश अर्ज प्राप्त झाले. प्राथमिक फेरीतून शालेय गटातील ८ व खुल्या गटातील ८ अशा एकूण १६ दुर्ग प्रतिकृतींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. प्राथमिक फेरीचे परीक्षण शिवम घोडजकर यांनी केले. अंतिम फेरीतील दुर्गांचे प्रत्यक्ष पाहणी द्वारे छायाचित्रण व चित्रीकरण आयोजन समितीमार्फत करण्यात आले असून, त्याआधारे अंतिम पारितोषिक विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.
सदर समारंभास सर्व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच दुर्गबांधणी स्पर्धेतील सहभागी समुहांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
