ठाणे : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासना मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि जनजागृती व्हावी, या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कळवा येथे ‘ज्येष्ठ नागरिक जनजागृती शिबीर व मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. अशी समाज कल्याण आयुक्त ठाणे यांनी दिली. दरवर्षी ८ ते १४ एप्रिल या कालावधीत राज्यभरात सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिलेले आहेत.
या मेळाव्याचे उद्घाटन आणि मार्गदर्शन करताना कोकण विभाग फेस्कॉमचे कायदेशीर सल्लागार ॲड. प्रमोद ढोकळे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या विविध कायद्यांबाबत अत्यंत मोलाचे आणि सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी श्रद्धा खैरे, सहायक लेखाधिकारी अरुण साळुंखे, वरिष्ठ निरीक्षक मीरा साळुंखे, समाज कल्याण निरीक्षक अभिजीत शिंदे आणि कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याला ज्येष्ठ नागरिक संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पारसिक नगर, कळवा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर गाडे, सचिव डॉ. श्रीराम कुडक आणि ठाणे मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश दिघे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक लेखाधिकारी अरुण साळुंखे यांनी केले आणि अध्यक्षीय भाषणाने या मेळाव्याची सांगता झाली. शासनाच्या विविध योजना आणि कायदेशीर तरतुदींची माहिती मिळाल्याबद्दल उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *