– राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन
अशोक गायकवाड
मुंबई : ‘भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचे दृढ बंध असून या संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी आपण भारत दौऱ्यावर आलो आहोत. आर्थिक सहकार्य, व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी वाढविणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश आहे’, असं मत म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. त्यापूर्वी झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग बोलत होते.
राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग म्हणाले की, भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांचा वसाहतवादाचा समान इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही दोन्ही देशांमधील संबंध कायम घनिष्ठ राहिले आहेत. भारत आणि म्यानमार यांच्यात सुमारे १,६०० किलोमीटरची भौगोलिक सीमा असून विस्तीर्ण सागरी सीमाही दोन्ही देशांना जोडते. त्यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि परस्पर सहकार्याच्या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
भारत भेटीदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई दौऱ्यात त्यांनी जवाहरलाल नेहरू बंदराला भेट देऊन व्यापार परिषदेत सहभाग नोंदविला. गेल्या वर्षी म्यानमारमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर भारताने ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत वैद्यकीय पथके, तात्पुरते रुग्णालय, मदतसामग्री आणि मानवतावादी सहाय्य पाठविल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले. कोविड-१९ काळात भारताने पुरविलेल्या लस, ऑक्सिजन सिलिंडर आणि अन्नसामग्रीबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, भगवान बुद्ध हे भारत आणि म्यानमार यांना जोडणारे अध्यात्मिक सेतू आहेत. विपश्यना साधना पद्धती भारतात लुप्त होत असताना म्यानमारने ती जतन केली आणि आज जगभरातील लाखो लोकांना त्याचा लाभ होत आहे. भारतातील बुद्धिस्ट सर्किटमुळे दोन्ही देशांमधील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ आणि ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणांमध्ये म्यानमारला विशेष महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद करत राज्यपालांनी म्यानमार हा भारतासाठी आग्नेय आशिया आणि आसियान देशांकडे जाणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगितले. राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग यांच्या भारत भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस म्यानमार राष्ट्रपती कार्यालयाचे केंद्रीय मंत्री खिन माउंग यी, परराष्ट्र व्यवहार मंत्री टिन माउंग स्वे, संरक्षण दलातील लेफ्टनंट जनरल मो म्यिंट स्वे, भारताचे म्यानमारमधील राजदूत अभय ठाकूर, म्यानमारचे भारतातील राजदूत तसेच राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
त्यानंतर आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमास राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच मरिटाईम एअर ऑपरेशन्सचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर व्हाइस मार्शल प्रशांत वडोदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *