नालेसफाईनंतरचा गाळ व कचरा तात्काळ हटविण्याबाबत आयुक्तांची सूचना
मिरा-भाईंदर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे नियोजनबद्ध, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्तांनी विविध भागांतील नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान मूर्धा खाडी, राई गाव, डोंगरी आईस फॅक्टरी परिसर, पाली, गणेश देवल नगर, प्रशांत हॉटेलजवळील रेल्वे समांतर नाला, एस.एन. कॉलेज परिसर, चाळघर उघाडी, काशिमीरा हायवे तसेच महाजनवाडी येथील बाप्पा सीताराम मंदिर ते महाविष्णू मंदिर परिसरातील प्रमुख नाले आणि जलनिस्सारण मार्गांची तपासणी करण्यात आली. यावेळी नालेसफाईची गती, कामाचा दर्जा, गाळ उपसा, कचरा निर्मूलन आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व नालेसफाईची सुमारे ९० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व नाले, गटारे आणि जलनिस्सारण मार्गांची साफसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना आयुक्तांनी उर्वरित कामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, यासाठी अधिक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. काही ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि इतर अडथळे तातडीने हटविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ व कचरा रस्त्यालगत अथवा नाल्यांच्या कडेला दीर्घकाळ न ठेवता त्याची तात्काळ विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देऊन कामांना अधिक गती देण्यास सांगितले.
महानगरपालिकेकडून यंदा मान्सूनपूर्व नाले सफाईची कामांवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत नियमित क्षेत्रीय पाहणी केली जात आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि जलमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका युद्धपातळीवर कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन, उद्यान अधीक्षक नागेश वीरकर, स्वच्छता निरीक्षक, संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच कंत्राटदार उपस्थित होते.
