दोन तरुणांचा मृत्यू
कल्याण : टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण-मुरबाड महामार्गावर वरप येथे मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर टिटवाळा पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर मुरबाडच्या दिशेने जात होता. त्याचवेळी त्याच्या पाठीमागून येणारी बर्कमन गाडी कंटेनरच्या मागील भागावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीतील तीनपैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृतांची ओळख पवन गुप्ता (वय २८, रा. चोप्रा कोर्ट, उल्हासनगर) आणि राजू गुप्ता (वय २२, रा. वरप) अशी झाली आहे. अपघातात जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच कंटेनर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे म्हणाले, “वरप परिसरात पहाटे झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.”
