आज ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने’चे विराट आंदोलन!

अनिल ठाणेकर
ठाणे, राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने’ने आता थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी येत्या गुरुवारी, १६ एप्रिल रोजी, जिल्हा परिषद ( बी. जे) . हायस्कूल  जांभळी नाका ठाणे या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने  दिला आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांना निवेदन धाडण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या विसंगत निर्णयांमुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक आणि मानसिक दडपणाखाली आहेत. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे शिक्षकांचे कंबरडे मोडले असून, वारंवार विनंती करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व वेतन तर्कहीन निकषांमुळे शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचे वेतन थांबवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.गेल्या २ ते ६ वर्षांपासून शिक्षकांची हक्काची देयके थकली आहेत. निधी उपलब्ध असूनही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कोट्यवधींचा निधी व्यपगत (Lapse) झाला असून, १५ एप्रिलपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून क्षकांना सक्तीने निवडणुकीच्या कामात (BLO) जुंपले जात आहे. हे अशैक्षणिक काम तातडीने थांबवण्याची मागणी पत्रात केली आहे. एप्रिल महिना अर्धा संपला तरी मार्चचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे शिक्षकांचे कर्जाचे हप्ते थकले असून त्यांना नाहक दंड सोसावा लागत आहे. ‘१ तारखेला पगार’ ही परंपरा कायम राखण्याची आठवण संघटनेने करून दिली १० वी, ११ वी आणि १२ वीच्या परीक्षा आणि निकालाच्या धामधुमीत ‘पटपडताळणी’चा घाट घातला जात आहे, जो शिक्षकांना नाहक त्रास देणारा आहे. हा कार्यक्रम सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान घेण्याची मागणी केली आहे.”प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे शिक्षकांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. जर हे प्रश्न तातडीने सुटले नाहीत, तर १६ एप्रिलचे आंदोलन हे केवळ सुरुवात असेल. शिक्षकांच्या हक्कासाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *