मीरा-भाईंदर: कधी सुस्त प्रशासन, तर कधी फाईलींच्या जंजाळात अडकलेला सामान्य माणूस… पण आज मीरा-भाईंदरमध्ये चित्र काहीसं वेगळं होतं. जनतेचा थेट संवाद आणि प्रश्नांचा जागच्या जागी निपटारा करण्यासाठी आज मीरा भाईंदर शहरात महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि मीरा-भाईंदर शहराचे लाडके लोकप्रतिनिधी प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने भव्य लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले असून खऱ्या अर्थाने लोकांना येथे न्याय मिळायचे दिसले. केवळ आश्वासनं नाही, तर थेट कृतीचा अनुभव आज मीरा-भाईंदरकरांनी घेतला.
लोकशाहीत जनता हीच राजा असते, हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून आयोजित या लोकदरबारात महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन, परिवहन आणि वाहतूक विभागाचे अधिकारी एकाच व्यासपीठावर हजर होते. सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकणे आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या तावडीतून सोडवून तात्काळ मार्गी लावणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी बोलावलेल्या या दरबारात काही अधिकाऱ्यांनी दांडी मारणे मंत्री सरनाईक यांना मुळीच रुचले नाही. अशा दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांची त्यांनी जाहीर कानउघाडणी करत, “जनतेची कामे टाळणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा दिला. लोक दरबारातील मंत्री सरनाईक यांचा हा रुद्रावतार पाहून उपस्थित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. या पहिल्याच लोकदरबारात एकूण २७३ नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. यात सर्वाधिक तक्रारी महापालिकेच्या कारभाराशी संबंधित होत्या. सरनाईक यांनी कोणताही विलंब न लावता, उपस्थित असलेल्या आयुक्तांपासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रश्नांची सरबत्ती करून अनेक प्रकरणांत जागच्या जागी निर्णय घेण्याचे आदेश दिले.या लोकदरबारात केवळ महापालिकेच्या तक्रारींचाच पाऊस पडला नाही, तर ७/११ कंपनीच्या विरोधात नागरिकांनी संतापाची लाट उसळली होती. ७/११ कंपनीकडून सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे त्रस्त झालेल्या शेकडो नागरिकांनी पुराव्यांसह आपल्या कैफियती मांडल्या. या कंपनीच्या मनमानी कारभाराची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी कडक भूमिका घेतली. “जनतेची लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.मीरा-भाईंदरकरांना दिलासा देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठी घोषणा केली. “हा केवळ एकदाच होणारा कार्यक्रम नाही. इथून पुढे दर महिन्याला असाच लोकदरबार मीरा -भाईंदर शहरात भरवला जाईल,” असे आश्वासन सरनाईक यांनी दिले. यामुळे प्रशासकीय विलंबाचा फटका बसणाऱ्या सामान्य जनतेला मोठा आधार मिळाला आहे. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणतात की, “जनतेचा वेळ आणि पैसा दोन्ही महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांनी खुर्चीवरून उठून लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. हा लोकदरबार म्हणजे सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचे व्यासपीठ आहे. महापालिकेच्या रखडलेल्या कामांपासून ते ७/११ कंपनीच्या जाचापर्यंत प्रत्येक विषयावर सरनाईक यांनी जनतेला आश्वस्त केले. “मीरा-भाईंदरचा नागरिक हा या शहराचा मालक आहे, त्याला वाऱ्यावर सोडणार नाही,” असा शब्द देत त्यांनी प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईला चाप लावणारा हा ‘लोकदरबार’ शहरात सध्या चर्चेचा विषय ठरला असून, मंत्री सरनाईक यांच्या या धाडसी पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.आजचा हा लोकदरबार केवळ एक कार्यक्रम नसून, मीरा-भाईंदरच्या सामान्य जनतेच्या प्रश्नांना मिळालेली ‘मंत्रालयीन ताकद’ आहे, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या.
