ठाणे : ठाणे वर्तक नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग ४ परिसरात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत आज सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वसंत विहार सर्कल, नळपाडा, खेवरा सर्कल, हॅपी व्हॅली सर्कल, मानपाडा सिग्नल तसेच टिकूजीनी वाडी रोड व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करुन रस्ते पाण्याने साफ करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक मुकेश मोकाशी, सिद्धार्थ पांडे, उपायुक्त दिनेश तायडे, मधुकर तायडे, आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात सुरू असलेली सर्वंकष स्वच्छता मोहीम महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभागात व्यापक स्वरूपात राबविली जात आहे.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छतेची शपथ घेवून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुमारे १५० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी दोन जेटिंग मशीन, शौचालय स्वच्छता गाड्या, C&D, JCB, डंपर तसेच लहान-मोठ्या मिळून १० घंटागाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मोहिमेदरम्यान एकूण १० टन कचरा व माती उचलण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत गार्डन विभाग, अतिक्रमण विभाग, फायलेरिया विभाग तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, हेमंत चौधरी, बांधकाम विभागाचे अभियंता रणधीर तसेच इतर स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी सर्वंकष स्वच्छता मोहीम प्रत्येक प्रभागात नियमित राबविण्यात येणार असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.
