राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन वाशी येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ६० व्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उप उपांत्य फेरीत मुंबईच्या सौरभ मतेने तीन पर्यंत रंगलेल्या लढतीत पुण्याच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू अनिल मुंढेंवर १९-२१, २५-१५ व २२-१७ असा चुरशीचा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिला सेट सौरभने केवळ दोन गुणांच्या फरकाने गमावला होता. परंतु दुसऱ्या सेटमध्ये त्याने बरोबरी साधली. आणि तिसरा सेटमध्ये सातव्या बोर्डनंतर १७-१७ अशी समान गुणसंख्या असताना शेवटच्या बोर्डात असलेल्या ब्रेकचा फायदा उठवत पाच गुण प्राप्त करून २२-१७ असा सेट आणि सामना खिशात घातला. तर दुसरीकडे विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेला हार पत्करावी लागली. पुण्याच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू अभिजित त्रिपनकरने प्रशांतला तीन सेटनंतर २३-२२, ८-२५ व २४-१४ असे पराभूत केले. या सामन्यात प्रशांतने पहिला सेट केवळ एक गुणाच्या फरकाने गमावला होता.
महिला एकेरीच्या उप उपांत्य लढतीत पालघरच्या श्रुती सोनावणेने तीन सेटमधील रंगतदार लढतीत मुंबईच्या रिंकी कुमारीवर २०-७, १८-१८ व १८-६ असा विजय मिळवला. तर आंतर राष्ट्रीय कॅरमपटू निलम घोडकेने ठाण्याच्या चैताली सुवारेवर तीन सेटमध्ये पहिला सेट ०-२५ असा सहज गमावूनही पुढील दोन सेट मध्य २२-१६ व २२-२१ असा निसटता विजय प्राप्त केला.
महिला वयस्कर गटाच्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या शोभा कामतने मुंबईच्या रोझिना गोदादला २५-४, २२-२१ असे सरळ दोन सेटमध्ये नमवून अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे मुंबई उपनगरच्या माधुरी तायशेटेने ठाण्याच्या मीनल लेले खरेवर तीन सेटमध्ये १०-२४, १६-१५ व २२-१९ असा जेमतेम विजय मिळवला.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे  इतर निकाल पुढील प्रमाणे
संदीप दिवे ( जळगाव ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-६, ८-२३, २५-२०
झैद अहमद फारुकी ( ठाणे ) वि वि रहिम खान ( पुणे ) १२-२४, २५-१, २५-५
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे  इतर निकाल पुढील प्रमाणे
समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) २५-२२, २५-७
ऐशा साजिद खान ( मुंबई ) वि वि प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) २३-१९, २३-१५
वयस्कर पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे
हेमंत पांचाळ ( मुंबई ) वि वि नूर महम्मद शेख ( मुंबई ) २५-१२, २४-१७
संजय थिटे ( पुणे ) वि वि मिलिंद वाडकर ( मुंबई उपनगर ) ७-२५, २५-१०, २५-१
सत्यनारायण दोंतुल्ला ( मुंबई ) वि वि गिरीधर भोज ( मुंबई उपनगर ) १२-१३, २३-१०, २०-१५
फय्याज शेख ( पुणे ) वि वि शब्बीर खान ( मुंबई उपनगर ) २५-१५, ६-२२, २१-७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *