अनिल ठाणेकर
ठाणे-विर्थ्यांसोबतचा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो आणि समाजाला काहीतरी परत देण्याची हीच खरी संधी असते. अशा भावना व्यक्त करत आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी कर्णबधीर विशेष विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावणाऱ्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक हे कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्मयोगी वृत्तीने कार्य करत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर आपल्या शाळा आणि शिक्षकांकडे नक्कीच वळून पाहावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे पूर्व कोपरी येथे विशेष विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मोफत वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. भारतीय जनता पार्टी, कोपरी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाने वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळीच आदर्श परंपरा जपली.भारतीय स्त्री जीवन विकास परिषद संचालित कमलिनी कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. ठाणे पूर्व येथील सभागृहात शुक्रवारी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना आमदार निरंजन डावखरे यांनी, “समाजाने आपल्याला दिलेले देणे आपण समाजाला परत दिले पाहिजे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नवी दिशा मिळते. या संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांसाठी पालकांपेक्षाही अधिक मेहनत घेतात, असे नमूद करत त्यांनी त्यांच्या कमलिनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांपैकी भविष्यात अनेकजण मोठं यश संपादन करतील. मात्र, आयुष्यात पुढे गेल्यानंतर एकदा तरी आपल्या शाळेकडे आणि शिक्षकांकडे वळून पाहा. त्यांनी दिलेल्या संस्कारांची जाणीव ठेवा, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. तसेच वाढदिवस केवळ औपचारिक साजरे न करता विद्यार्थ्याना मदत करण्याची परंपरा जोपासणाऱ्या कृष्णा भुजबळ यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक आ. डावखरे यांनी केले. या प्रसंगी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक भरत चव्हाण, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष राजेश गाडे, अमरीश ठाणेकर, विनोद टिकमाणी, सिद्धेश पिंगुळकर, सचिन कुटे, रोहित कवे, शेखर निकम, मनोज तिवारी, कमलाकर कुरतडकर, प्रफुल्ल नाखवा, नितीन पाटील आदीसह भाजप कोपरी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच भारतीय स्त्री जीवन परिषदेच्या पद्मजाताई काळे, मानसीताई सहस्त्रबुद्धे आणि कमलिनी विद्यालयाचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कृष्णा भुजबळ दरवर्षी राबवित असलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा मिळते, अशा भावना व्यक्त केल्या. शाळा व्यवस्थापन आणि संस्थेच्या मान्यवरांनी शाळेप्रती असाच स्नेह कायम ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
