६० वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी आयोजित ६० वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नुकतीच नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिशनच्या सिल्वर ज्युबिली बँक्वेट हॉलमध्ये पार पडली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ठाण्याचे वर्चस्व पाहायला मिळाले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या झैद अहमदने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा रंगतदार लढतीत १९-२३, २५-१० व २५-६ असा पराभव करून जेतेपद मिळवले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत जळगावच्या संदीप दिवेने मुंबईच्या सौरभ मतेवर २३-१, २५-९ असा विजय मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला. तर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ठाण्याची समृद्धी घाडीगावकर सरस ठरली. तिने पालघरच्या श्रुती सोनावणेचा २१-६, २५-९ असा सहज पराभव करत विजय प्राप्त केला. या गटाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या निलम घोडकेने ऐशा साजिद खानवर २५-६, २५-१४ अशी मात केली.
वयस्कर पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या संजय थिटेने मुंबईच्या सत्यनारायण दोंतुल्लाचा २०-१९, २५-१३ असा पराभव करून जेतेपद मिळवले. या गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या फय्याज शेखने मुंबईच्या हेमंत पांचाळचा २२-८, २०-१९ असा दोनसेटमध्ये काठावर विजय मिळवला. वयस्कर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. या सामन्यात कोल्हापूरच्या शोभा कामतने ८ वे राज्य विजेतेपद पटकावताना मुंबई उपनगरच्या माधुरी तायशेटेचा २५-४, १४-१५ व २५-९ असा पराभव करत विजय मिळवला. तर तिसऱ्या क्रमांक प्राप्त करताना मुंबईच्या रोझिना गोदादने ठाण्याच्या मीनल लेले खरेचा १३-१२, २४-७ असा पराभव केला. सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट कॅरम व बुलेट शॉट सोंगट्यांचा वापर या स्पर्धेत करण्यात आला होता.
नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय एस पाटील, सचिव विजय आर पाटील, खजिनदार सी ए संजय निकम, कॅरम विभागाचे प्रमुख प्रकाश श्रीनिवासन, राज्य कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव जितेंद्र दळवी यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. याप्रसंगी जिमखान्यचे सदस्य सौ कविता गांगुली, सी ए समीर गवळी, राजू शिंदे व अशोक पाटील उपस्थित होते. केतन चिखले यांनी या प्रसंगी असोसिएशनने घेतलेल्या पंच परीक्षेचा निकाल जाहीर केला. रत्नागिरीचा शैलेश वाघाटे व पुण्याचा रोहित कदम पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी जाहीर केले. नवी मुंबईत स्पोर्ट्स असोसिएशन यापुढे राष्ट्रीय स्पर्धेचे आव्हान पेलण्यास उत्सुक आहे असे उद्गार उपाध्यक्ष विजय एस पाटील व सचिव विजय आर पाटील यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *