शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱा हा आंबा महोत्सव १ ते १२ मे पर्यंत गावदेवी मैदानात !
अनिल ठाणेकर
ठाणे : अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे झालेली फळगळ व थ्रीप्स रोग, तुडताडा किटकांच्या प्रादूरर्भावामुळे तसेच हवामान बदलामुळे यावर्षी ४० टक्केच आंबा पिक हाती लागले आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षापासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे, अशी कोकणातील आंबा शेतकऱ्यांची परवड आमदार संजय केळकर यांनी मांडली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱा हा आंबा महोत्सव १ ते १२ मे पर्यंत गावदेवी मैदानात होणार असल्याची माहिती आ. संजय केळकर यांनी दिली आहे.
कोकणातील एकूण १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची पागवड केली जाते. २०२१ साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न ३ लाख २० हजार मेट्रिक टन होते. यातील २६० कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि १०० कोटी रुपयांचा आंबा निर्यात करण्यात आला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन २०२२ मध्ये २ लाख ५६ हजार मेट्रिक टन आणि २०२३ रोजी १ लाख २८ हजार मेट्रिक टन झाले असून १२६ कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली आणि ५४ कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. या वर्षी अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे फळगळ झाली व थ्रीप्स रोग, तुडताडा किटकांच्या प्रादूरर्भावामुळे चाळीस टक्केच आंबा पिक हाती लागले आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षापासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे, या साऱ्या परिस्थितीचा ठाणेकर नक्कीच विचार करून आंबा महोत्सवास दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी आंबा महोत्सवात करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे. दरवर्षी होणारा हा आंबा महोत्सव म्हणजे व्यापारी पेठ नसुन एक चळवळ आहे. गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाला लाखो ग्राहक भेट देत असतात. याठिकाणी प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध आहे. तरी, कोकणातील अस्सल हापुस आब्यांसाठी खवय्यांनी राजेंद्र तावडे ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. यावेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ठामपा माजी उपमहापौर सुभाष काळे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट
यंदा असह्य उकाड्यात हैराण ठाणेकरांना आंबा महोत्सवाचा गोडवा अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानात १ मे पासून आंबा महोत्सवास सुरुवात होत आहे. १ ते १२ मे पर्यंत आंबा महोत्सव, सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरु असणार आहे. यावेळी महोत्सवाचे १७ वे वर्ष आहे. शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात, कोकणातील अस्सल हापूस आंबा, पायरी, रत्ना केसर आंब्या बरोबरच आंबा- फणस पोळी, सरबते, सुके-ओले काजू, मालवणी मसाले, पापड, लोणचे अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे कोकणातील शेतकऱ्यांचे ४५ स्टॉल व ठाण्यातील महिला बचत गटाचे ५ स्टाॅल असे ५० स्टॉल या महोत्सवात असणार आहेत.
चौकट
महोत्सवात मिळणार अस्सल हापुस !
सध्या बाजारात हापुस आंब्याच्या नावाखाली सर्रास कर्नाटकचा आंबा विकला जातो. कोकणातील अस्सल हापुस कापल्यावर केशरी रंगाचा असतो. तर कर्नाटकी आंबा पिवळा असतो. ठाण्यातील आंबा महोत्सवात ५०० ते ९०० प्रती डझन या दराने आंबा उपलब्ध असुन तरी चोखंदळ ग्राहकांनी महोत्सवातच अस्सल हापुस खरेदी करावी. असे आवाहन कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केले आहे.
