माणकिवली ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि शेतकरी आक्रमक
रायगड- कर्जत: (अशोक गायकवाड )–कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, डंपिंग ग्राउंड उभारण्याच्या प्रस्तावावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि शेतकरी यांची दिशाभूल करून ग्रामपंचायतीकडून मनमानी व बेकायदेशीर कारभार केला जात असल्याचे आरोप आता उघडपणे समोर येत आहेत. कडाव ग्रामपंचायतीने २७ जून २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठराव क्र. ४/९ चा आधार घेत माणकिवली गावाच्या रस्त्यालगत असलेल्या गुरचरण जागेवर डंपिंग ग्राउंड उभारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प सर्व्हे क्रमांक १३७/१७ या जागेवर प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत गंभीर विसंगती आणि दिशाभूल झाल्याचे आता उघड होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सदर ठरावाबाबत ग्रामपंचायतीतील अनेक सदस्यांनाच माहिती नसून, त्यावेळचे सरपंच, उपसरपंच असलेल्या सदस्यांना देखील या निर्णयाची कल्पना नाही. विशेष म्हणजे ज्या वॉर्डामध्ये डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या वॉर्डातील प्रतिनिधींनाही या ठरावाची माहिती नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे हा ठराव प्रत्यक्ष ग्रामसभेत मंजूर झाला होता का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, डंपिंग ग्राउंडसाठी सांगण्यात आलेल्या सर्व्हे क्रमांकाबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रामपंचायतीने ज्या सर्व्हे क्रमांक १३७/१७ चा उल्लेख केला आहे, ती जागा सुमारे ६६०.८० हे.आर. चौ.मी. क्षेत्रफळाची असून ती प्रत्यक्षात माणकिवली गावाच्या रस्त्यालगत नसून कडाव गावाच्या बाहेरील गुरचरण क्षेत्रात असल्याचे सांगितले जात आहे. तर माणकिवली गावालगत असलेल्या जागेचा वास्तविक सर्व्हे क्रमांक १३७/१३ असल्याचे समोर आले आहे. ही जागा सुमारे २०० हे.आर. चौ.मी. क्षेत्रफळाची असून ती “सकस आहार” योजनेसाठी राखीव असल्याची माहिती सातबाराच्या नोंदीत नमूद आहे. तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेश क्रमांक मशा/जमीन/घ-२/९८६६५/०८ दि. १९ डिसेंबर २००८ नुसार या जमिनीपैकी ०.२००० हे.आर. क्षेत्र कडाव मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी राखीव असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, एका जागेच्या सर्व्हे नंबरवर ठराव मंजूर करून प्रत्यक्षात दुसऱ्याच जागेवर डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे केवळ ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि शेतकरी यांचीच नव्हे तर पोलीस प्रशासनाची देखील दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे माणकिवली गावात संतापाची लाट पसरली असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांनी घेतलेल्या बैठकीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांच्या विरोधाला डावलून डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
