मुंबई महापौर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा
मुंबई : कीर्ती कॉलेज , वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) येथे मुंबई महानगरपालिकेच्या सौजन्याने आणि मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई महापौर चषक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत आर्यन मॅटर, विराज पावसकर, योगेश गुंड, राजेश शेटे, सेजल बेलवलकर, तन्वी शिंदे, सेजल मकवाना, रुबी दास या खेळाडूंनी सर्वोत्तम लिफ्टरचा मान मिळवला. यावेळी बक्षीस समारंभाच्या प्रसंगी मुंबईच्या महापौर रितूताई राजेश तावडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुंबईतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आपली महानगरपालिका नेहमीच कटिबद्ध राहिली आहे. शहरातील क्रीडा मैदानाचा विकास करणे, खेळाडूंसाठी आधुनिक जिम आणि व्यायामाची साधने उपलब्ध करून देणे इत्यादी योजना आपण अधिक प्रभाविपणे राबवित आहोत. त्यामुळे मुंबईचे खेळाडू ऑलिंपिकच्या व्यासपीठावर देशाचा तिरंगा फडकवतील आणि त्यासाठी महापालिका सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील ही मी तुम्हाला ग्वाही देते.
या स्पर्धेत १५० पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अॕड. नील हेळेकर (विश्वस्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे), संजय सरदेसाई, यांनी (सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार) अनिल मार्तंड (प्राचार्य कीर्ती कॉलेज), संजय माधव (सह चिटणीस व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार) दिलीप केळुसकर,(दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त) महेश पेडामकर, (अध्यक्ष,मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त) समीर दळवी, (सचिव मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त) आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा बक्षीस समारंभ मुंबईच्या महापौर रितूताई तावडे यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेला स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सदिच्छा भेट दिली आणि खेळाडूंचे कौतुक केले. या स्पर्धेच्यानिमित्ताने शिवछत्रपती पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त झालेल्या आजी-माजी १४७ खेळाडू प्रशिक्षक यांना गौरविण्यात आले हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते.
मुंबई महापौर चषक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा किताब विजेते पुरुष – १) सब ज्युनिअर स्ट्रॉंग बॉय- आयर्न मॅटर (मुंबई शहर), २) जूनियर स्ट्रॉंग बॉय – विराज पावसकर (उपनगर मुंबई), ३) सीनियर स्ट्रॉंग मॅन योगेश गुंड -(मुंबई शहर), ४) मास्टर स्ट्रॉंग मॅन-राजेश शेटे (मुंबई शहर)
किताब विजेत्या महिला – १) सब ज्युनिअर गर्ल -सेजल बेलवलकर (उपनगर मुंबई), २)ज्युनिअर स्ट्रॉंग गर्ल-तन्वी शिंदे (मुंबई शहर), ३) सीनियर स्ट्रॉंग वुमन-सेजल मकवाना, (उपनगर मुंबई), मास्टर स्ट्रॉंग वुमन – रुबी दास (मुंबई शहर)
