उल्हासनगर : पावसाळा सुरू व्हायला मोजकेच दिवस उरले असून उल्हासनगर महानगरपालिकेने मोठ्या नाल्यांची सफाई जेसीबी मशीन द्वारे सुरू केली आहे. शहरात अनेक छोट्या नाल्या देखील आहेत. दरवर्षी काही प्रभागातील नाल्यातील सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत असते. याशिवाय ज्या नाल्यांची पूर्णपणे साफसफाई केली जात नाही. पावसाळ्यात त्या नाल्या परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत असतात. पावसाळा सुरू होण्याआधी सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुकादम प्रत्येक प्रभागातील नालेसफाई करून घेत असतात. या नालेसफाईला त्यांना रोजंदारीवर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची गरज भासत असते. पण रोजंदारीवर काम करणारे हे कर्मचारी ज्या पद्धतीने नालेसफाई करत असतात ती नालेसफाई कायमस्वरूपी काम करणारे सफाई कर्मचारी देखील करू शकत नाही. हे उल्हासनगर शहरातील सुभाष टेकडी परिसरात नुकताच नालेसफाईच्या कामावरून दिसून आले.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौका जवळील नायडू यांच्या निवासस्थान जवळ भला मोठा वाहणारा नाला आहे. दरवर्षी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. नाल्याचे कठडे तुटले आहेत. पावसाळ्यात या नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या घराला धोका निर्माण होतो. जवळपास अनेक भागातून या नाल्यात सांडपाणी वाहून येत असते . गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्याची दुरुस्ती ही करण्यात आली नाही. पण पावसाळा सुरू होण्याआधी या नाल्याची सफाई मात्र केली जाते.
नुकताच सुभाष टेकडीतील सफाई मुकादमाने अशोक वन परिसरातील या नाल्याची रोजंदारीवर कर्मचारी लावून नाल्याची पूर्णपणे साफसफाई करून घेतली. त्यावेळी रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी चक्क अति उकाडा असल्याने भर उन्हात अर्ध्या कपड्यावरच नाल्यामध्ये उतरून सफाई सुरू केली. या नाल्या मधील मोठमोठ्या दगडी गाळामध्ये रुतून बसल्याने नाल्यातील प्रवाह व्यवस्थित होत नव्हता. त्यामुळे या रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी चक्क नाल्यात बसून नाल्यातील घाण व मोठमोठ्या दगडी बाहेर काढल्या. इतक्या चांगल्या पद्धतीने साफसफाई या नाल्याची झाल्यामुळे आता या नाल्याने मोकळा श्वास घेतला आहे. पण नाल्याची झालेली दुरावस्था मात्र पालिकेला दिसत नाही. तुटलेल्या नालीच्या कठड्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात त्या परिसरात तलावाचे स्वरूप दिसून येत असते. याशिवाय तो रस्ता पाण्याखाली जात असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना गुडघ्यावर पाण्यातूनच बाहेर पडावे लागते. खरंतर पावसाळा सुरू होण्याआधी या नाल्यांची दुरुस्ती होणे गरजेचे होतं. पण नाल्याची ही दुरावस्था पालिकेला तर दिसत नाहीच पण स्थानिक निवडून आलेल्या नगरसेवकांना देखील दिसून येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
