भाजपाला उशिरा का होईना पण जाग आली – शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे
कल्याण : हिंदुनी अशा घंटानाद आंदोलनात सहभागी होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून उशिरा का होईना पण भाजपाला जाग आली असून हिंदूंच्या मतांची निवडणुकीवेळी भिक मागतो हे त्यांना लाजिरवाणे वाटत असेल म्हणून हिंदुत्वासाठी काही तरी केलं पाहिजे यासाठी भाजपासह सर्व घंटानाद आंदोलनात सहभागी होत असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपावर केली. बकरी ईदच्या निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवसेनेच्या वतीने कल्याणच्या दुर्गाडी किल्याजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, महापौर हर्षाली चौधरी, शहर प्रमुख रवी पाटील, उपनेत्या विजया पोटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे आंदोलन त्यांच्यानंतर अद्यापही सुरु आहे. बकरी ईदच्या दिवशी कल्याण येथील मुस्लिम बांधव एकत्रितपणे येऊन दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात नमाज पडतात. कायदा सुव्यवस्था बिघडु नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून नमाज कार्यक्रम संपेपर्यंत कोणालाही दुर्गाडी देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोडत नाहीत.
शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या घंटानाद आंदोलनाला सुरवात केली. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी कल्याणच्या लोकमान्य टिळक चौक येथून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केले. मात्र पोलीस प्रशासनाने या दोन्ही गटांना लालचौकी परिसरातच बॅरिकेट्स लावून रोखून धरले. ज्याठिकाणी काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ धक्काबुक्कीही झाली. तर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जात होती. आजही सकाळी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या वतीने घटानांद आंदोलन केले, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले, व नंतर सोडून दिले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी बोलतांना सांगितले कि, ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरील देवीचे दर्शन घेण्यासाठी जो अटकाव केला जातो, मज्जाव केला जातो तो चुकीचा आहे. आमच्यावर होणारा अन्याय सहन केला जाणार नसून हि बंदी सहन केला जाणार नाही. याबाबत उच्चन्यायालयात खटला सुरु असून त्याचा पाठपुरावा करत असून यामध्ये यश मिळेल. आमचा हक्क साबित राहण्यासाठी हे आंदोलन सातत्याने सुरु ठेवलं असल्याचे लांडगे यांनी सांगितले.
