कल्याण : जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि सत्यमेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य व मासिक पाळी जनजागृती विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या सुरुवाती चे वातावरण हलके-फुलके आणि संवादात्मक करण्यासाठी “आइस ब्रेकिंग गेम” ने करण्यात आली.
“पासिंग द सेंटेन्स” या खेळामध्ये एका महिलेच्या कानात एक वाक्य सांगण्यात आले आणि तेच वाक्य पुढील सहभागीच्या कानात सांगण्यास सांगितले गेले. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचताना त्या वाक्यात झालेला बदल सर्वांसमोर मांडण्यात आला. या उपक्रमातून माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाताना त्यामध्ये कशा प्रकारे बदल होऊ शकतो, याची जाणीव सहभागी महिलांना करून देण्यात आली,ह्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पवन जोहारे यांनी ही माहिती दिली.
जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अर्जुन बनसोडे यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ग्रामीण व शहरी वस्त्यांमधील महिला, मुले आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती संस्थेचे सचिव राहुल बनसोडे ह्यांनी सागितले.
कार्यक्रमाच्या मुख्य सत्रामध्ये संस्थेच्या सदस्या अस्मिता कहाळे यांनी महिलांशी संवाद साधत मासिक पाळीविषयी चर्चा सुरू केली. त्यांनी उपस्थित महिलांना आणि मुलींना त्यांच्या मासिक पाळीची पहिली तारीख, तसेच पाळीबाबतची पहिली माहिती त्यांना कोणी दिली, असे प्रश्न विचारून विषयाची सुरुवात केली. मासिक पाळी ही कोणतीही लाजिरवाणी किंवा वाईट गोष्ट नसून ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि आवश्यक शारीरिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महिलांनी आणि मुलींनी या विषयाबाबत खुलेपणाने बोलणे आणि योग्य माहिती मिळवणे अत्यंत गरजेचे असल्याचा संदेशही देण्यात आला.
महिलांच्या आरोग्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे स्तन कर्करोग यावरही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी शंकांचे निरसन करून घेतले. महिलांच्या आरोग्याबाबत योग्य माहिती, जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशा प्रकारचे उपक्रम समाजात आरोग्यविषयक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत संस्थेची सदस्य श्वेता पाटील यांनी व्यक्त केले.
