कल्याण: कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बकऱ्यांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी तिघांसह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमेश्वर गोपाळ महाले (वय ४५) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील एका सोसायटीच्या सार्वजनिक जागेत कोणतीही वैध परवानगी न घेता बकऱ्यांची कत्तल करण्यात येत होती. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला असून नियमांचे उल्लंघन झाल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी सलीम शेख (सोसायटी सचिव), शब्बीर मेमन (सोसायटी चेअरमन) तसेच उस्मान उमर यांच्यासह अन्य चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका आणि संबंधित विभागाची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी पशू कत्तल केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३२५, २२३(३)(५), महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १०५, ११७ तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून बाजारपेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *