मुख्यमंत्री कार्यालयाने दिले कारवाईचे आदेश….

इर्शाळवाडी भूस्खलनसारख्या दुर्घटनेची भीती….

रमेश औताडे

मुंबई : गेल्या नऊ वर्षांपासून तक्रार करूनही टेकडीवरील अतिक्रमणांकडे सिडको अधिका-यांच्या दुर्लक्षितपणामुळे शेकडो मानवी जीव व वन्य जीव यांची मृत्यूची वेळ आली आहे. इर्शाळवाडी भूस्खलन सारख्या दुर्घटनेतून कोणताही धडा हे सिडको सरकारी बाबू घेत नसल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सिडको अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाविरोधात स्थानिक रहिवासी,विद्यार्थी आणि पर्यावरण प्रेमींनी जेव्हा मूक मानवी साखळी तयार केली तेव्हा सरकारने दखल घ्यावी यासारखे दुर्दैवी बाब कुठेच नसेल अशी चिंता पर्यावरण, डोंगर, वन्यजीव वाचवा या आंतरराष्ट्रीय दखल प्राप्त सामाजिक संस्थेचे ” नॅटकनेक्ट फाऊंडेशन ” चे संचालक बी एन कुमार यांनी चिंता व्यक्त केली.

‘सेव्ह बेलापूर हिल्स’ आणि ‘स्टॉप मर्डर ऑफ ट्रीज’ अशा घोषणा देणारे बॅनर घेऊन रहिवासी, विद्यार्थ्यांनी, जेष्ठ नागरिकांना भर उन्हात मानवी साखळी केली व सरकारी बाबूंच्या मनमानी विरोधात मुक निदर्शने केली.

यावेळी नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार म्हणाले की, टेकडीवर अनेक बेकायदेशीर मंदिरे उभी राहिली आहेत आणि रहिवाशांनी नऊ वर्षां पूर्वी पत्रव्यवहार करून  इशारा देऊनही  कोणतीही कारवाई झालेली नसल्याने  नॅटकनेक्टने माहिती अधिकार अस्त्राचा वापर केला असता,   मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला या समस्येची चौकशी करण्यास सांगितले आहे.  कुमार म्हणाले की इमारतींमुळे टेकडी कमकुवत होऊ शकते आणि आगामी पावसाळ्यात भूस्खलन होऊ शकते, परंतु सिडकोने अद्याप निर्णायकपणे कार्यवाही केलेली नाही.

नॅटकनेक्टने आरटीआय अंतर्गत अर्ज दाखल करून टेकडी वाचवण्यासाठी कोणती पावले उचलली याची माहिती मागितली असता नऊ वर्षानंतर मुख्यमंत्री कार्यालय जागे झाले आहे. कुमार यांनी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यालाही याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितला आहे. यापूर्वी एक समिती या गंभीर समस्येकडे लक्ष देत असल्याचे थातुर मातुर माहिती दिली मात्र अद्यापही कारवाई सुरू केली नाही.

सिडकोकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याची खंत स्थानिक रहिवासी कपिल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. सर्व टेकडी  वनजमीन सिडकोच्या ताब्यात आहे. गोरगरीब जनतेला एक न्याय व श्रीमंत नागरिकांना वेगळा न्याय हे योग्य नाही असे स्थानिक रहिवासी कपिल कुलकर्णी यांनी सांगितले.

हिमांशू काटकर म्हणाले, “बेकायदेशीर बांधकामांना पाणी आणि वीज जोडणी मिळते हे धक्कादायक आहे. हिल व्ह्यू रो-हाऊस सोसायटीतील दशरथ भुजबळ म्हणाले की, टेकडीच्या चौफेर अतिक्रमणांमुळे वन्य जीवांचे प्रचंड नुकसान होत आहे आणि  दरडी कोसळण्याची भीती तर आहेच.

अनेक गृहिणी आणि मुले या सिडको अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारविरोधात  मूक आवाज देण्यासाठी वेळ काढत आहेत हे कौतुकास्पद आहे. हे संकट २०१५ चे आहे तेव्हा सिडकोचे तत्कालीन एमडी संजय भाटिया यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. जेव्हा मंदिराचे बांधकाम नुकतेच सुरू झाले होते. मात्र अद्याप काही कारवाई झाली नाही असे कुलकर्णी म्हणाले.

आता आपण टेकडीवर किमान 20 मंदिरे पाहू शकतो. या प्रकरणी उच्च अधिकारी सतत दुर्लक्ष्य करत आहेत.  इर्शाळवाडी भूस्खलनासारख्या दुर्घटनेतून कोणताही धडा हे अधिकारी घेत नाहीत अशी खंत खारघर टेकडी आणि वेटलँड समूहाच्या ज्योती नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *