००००००
कल्याण : कल्याण पूर्व ग्रामीण परिसरात महावितरणकडून वारंवार वीज खंडित प्रकार आता नागरिकांसाठी असह्य ठरत आहे. पहाटे नागरिक साखर झोपेत असताना वीज गायब होते, भरदुपारी कडाक्याच्या उष्णतेत कोणतेही ठोस कारण नसताना एक-दोन वेळा वीज खंडित केली जाते आणि संध्याकाळी पुन्हा त्याच प्रकारची सर्कस सुरू असते. या बेजबाबदार आणि निष्काळजी कारभारामुळे नागरिकांना अक्षरशः घामाने आंघोळ करण्याची वेळ येत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे अनेकदा वीजपुरवठा सुरू असतानाही एका फेजचा पुरवठा खंडित असतो, तर अनेक ठिकाणी अत्यंत कमी दाबाने (लो व्होल्टेज) वीजपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत नागरिकांची विद्युत उपकरणे निकामी होत आहेत. एसी, फ्रिज, टीव्ही, संगणक, पाण्याच्या मोटारी आणि इतर महागडी उपकरणे जळून किंवा शॉर्ट होऊन खराब होत आहेत. या आर्थिक नुकसानीची जबाबदारी महावितरण घेणार का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
कमी दाबाचा वीजपुरवठा आणि सततची खंडिती यामुळे छोट्या रुग्णालयांमध्ये आणि दवाखान्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी जनरेटरची सुविधा नसल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. बहुसंख्य इमारतींमध्ये लिफ्ट व्यवस्था वीजेवर अवलंबून असल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि अंथरुणाला खिळलेले रुग्ण यांचे हाल होत आहेत.
एकीकडे ग्राहकांनी बिल भरण्यास थोडाही उशीर केला तर तत्काळ वीज तोडण्याची घाई केली जाते. बिलाची मुदत संपण्यापूर्वीच रिक्षातून घोषणा करून “बिल भरा, अन्यथा मीटर काढून नेले जाईल” अशा धमकीवजा सूचना दिल्या जातात. मात्र ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याबाबत महावितरण पूर्णपणे उदासीन आहे. शहरी भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामीण भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना आता नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे. ग्राहकांकडून वेळेवर बिल वसूल करायचे, मात्र दर्जेदार सेवा द्यायची नाही, हा महावितरणचा दुटप्पी कारभार आता सहन केला जाणार नाही असा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत.
स्थानिक लाईनमनपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत संपूर्ण यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने काही कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्यांबाबत निष्काळजीपणा करत आहेत का, असा संशय नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. यापुढे कल्याण पूर्व (ग्रामीण) भागात विनाकारण वीज खंडिती, कमी दाबाचा वीजपुरवठा, एका फेजचा सततचा बिघाड, ग्राहकांची दमदाटी आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा सुरूच राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. संबंधित लाईनमन, अभियंते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना जनतेसमोर जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव वल्ली राजन यांनी दिला आहे.
