तीन दिवसांनंतर वडिलांना अटक
कल्याण : कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरातील रचना रॉयल इमारतीत राहणाऱ्या विवाहित मुलीची हत्या करून फरार झालेल्या वडिलला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर झालेल्या चौकशीत या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विनोद वसईकर यांनी तीन दिवसांपूर्वी आपली मुलगी गायत्रीची धारदार शस्त्राने हत्या केली होती. लग्नानंतर ती माहेर आली होती. घटनेनंतर विनोद वसईकर हा फरार झाला होता. बाजारपेठ पोलिसांनी शोधमोहीम राबवत अखेर त्याला ताब्यात घेतले. तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे, गायत्रीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन इतर जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला होता. याच गोष्टीचा राग विनोद वसईकर याचा मनात कायम होता. त्यांनी मुलीसाठी दोन वेळा साखरपुड्याची तयारी केली होती, मात्र गायत्रीने ते प्रस्ताव नाकारले होते. त्यानंतर तिने प्रेमविवाह केला.
घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर वडील आणि मुलगी यांच्यात या विषयावरून पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी धारदार शस्त्राने गायत्रीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर विनोद वसईकर घटनास्थळावरून पसार झाला. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शोधमोहीम राबवून त्यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांन मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *