अनिल ठाणेकर
ठाणे : २०१७ च्या महापालिका निवडणुकीत कळवा मुंब्रा विधानसभेतुन काँग्रेसला एकही तिकीट जितेंद्र आव्हाड यांनी दिले नाही. काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचे संयोजन करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी, ठाण्यातील काँग्रेस संपविण्याचे काम केले, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
सिन्नरच्या सभेमध्ये डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बेछूट असे आरोप केले. मला डॉ. जितेंद्र आव्हाड यांना एवढेच सांगायचे आहे की माझ्याबरोबर सकाळी ६ वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला समुदाय पहा. महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यातुन लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी साडेपाच पावणेसहा पासून देवगिरी बंगल्यावर रांग लावतात, ते दिसेल. पण आपल्याला कदाचित सकाळी उठायची सवय नसेल कारण आपले रात्रीस खेळ चालतो, अशी आपली प्रवृत्ती आहे.कायम जनसेवा सकाळी सहा वाजल्यापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार करत असतात. बैलाचे शिंग देखील आपल्याला लागले तर चालायला त्रास होईल, हाच माझा आपल्याला सल्ला आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांची परिस्थिती अशी आहे की, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. म्हणजे शिवसेनेला २०१९ पर्यंत विरोध केला. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध केला. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा दुस्वास केला. पण मुंब्र्यामधील शाखा पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर कोण होते तर जितेंद्र आव्हाड होते. कळव्याची शिवसेनेची शाखा व खारीगाव नाका येथील शाखा जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे तुटली. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत कळवा मुंब्रा विधानसभेतुन काँग्रेसला एकही तिकीट यांनी दिले नाही. काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचे संयोजन करणाऱ्या आव्हाड यांनी, ठाण्यात काँग्रेस संपविण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी केले, असा आरोप प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला.
सुप्रिम कोर्टात, वकिल अभिषेक मनु संघवी यांनी कुठलेतरी पोस्टर दाखविले की आदरणीय शरद पवारसाहेबांचे नाव आणि फोटो आम्ही वापरतोय. मी तरी असले पोस्टर बघितलेले नाही. कारण आम्हाला प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेबांकडून सक्त आदेश आहेत की पवारसाहेबांचे नाव व फोटो वापरायचे नाहीत. ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात देखील आपण पाहू शकता की इथे देखील स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब यांचा फोटो आहे. आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आम्ही पवारसाहेबांचे नाव व फोटो वापरत नाही. 1991 साली अजितदादा सार्वजनिक जीवनात आल्यानंतर खासदार म्हणून त्यांनी आपले राजकीय जीवन सुरु केले.त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत बारामतीचे नेतृत्व अजितदादा यांनी केले आहे. अनेक महत्त्वपूर्ण पदे अजितदादांनी भूषविली आहेत. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे.आणि कायम घड्याळ तिथे जिंकत आलेले आहे. म्हणून अजितदादांनी आवाहन केले आहे की, माझी निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळाला साथ द्या. काल आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेसाहेब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे है पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत.त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तटकरेसाहेबांना आश्वासित केले आहे की, विजय शिवतारे यांना बोलवून योग्य ती समज देईन. यामुळे स्थानिक पातळीवर या विषयावर पडदा टाकलेला आहे.ठाणे, कल्याण, भिवंडी या तीनही मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार विजयी करणे हा आमचा संकल्प आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या आढावा बैठकीत महाराष्ट्रातल्या १६ मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला होता.यात ठाणे, कल्याण,भिवंडीचा समावेश नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेसाहेब हे भाजपच्या शिर्ष नेतृत्वाशी चर्चा करुन लोकसभा जागावाटपाबाबत योग्य तो निर्णय घेतील.आणि राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा लढवायला मिळतील, अशी आशा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.
माझी लायकी काढणाऱ्यांच्यादृष्टीने मी त्यांच्या तुलनेत खूप लहान कार्यकर्ता आहे. माझ्यावर कुठलीही महागडी गाडी (पी.वाय. ०१ रजिस्ट्रेशनची) जबरदस्तीने बळकावली असा आरोप झालेला नाही. मी एकपत्नी, एकवचनी आहे. मी माझ्या दोन जुळ्या मुलांबरोबर माझा सुखी संसार करीत आहे. त्यामुळे माझी आणि त्यांची बरोबरीच होऊ शकत नाही.