कल्याण  : कल्याण पुर्वेतील  कोळसेवाडी परिसरात मोटारसायकलच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यांत पडल्याच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद हिंसक वळणावर गेला. तिघा तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आर्यन पणीकर हा रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तृप्ती बिल्डिंग, रेल्वे क्वार्टर परिसरातून पायी जात होता. त्यावेळी आरोपी प्रशांत कापसे याच्या मोटारसायकलच्या हेडलाईटचा प्रकाश आर्यनच्या डोळ्यांत पडला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपी प्रशांत कापसे, जयेश शिंदे आणि अवधूत राणे यांनी आर्यनला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रशांत कापसे याने धारदार शस्त्राने आर्यनच्या शरीरावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात आर्यन गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *