१५ जून रोजी रविंद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम
मुंबई : महाराष्ट्र ललित कला निधीतर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुणिदास संगीत सम्मेलनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुगम शास्त्रीय संगीताचा आगळावेगळा कार्यक्रम ‘पुरब की ठुमरी’ सोमवार, १५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका सुनंदा शर्मा आणि मालिनी अवस्थी आपल्या सुरांची मेजवानी रसिकांना देणार आहेत.
पद्मविभूषण दिवंगत गिरिजा देवी यांच्या दोन प्रतिभावान शिष्यांच्या सादरीकरणामुळे हा कार्यक्रम विशेष ठरणार आहे. बनारस घराण्याच्या परंपरेच्या प्रमुख पुरस्कर्त्या असलेल्या सुनंदा शर्मा या भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मान्यवर गायिका असून त्यांनी देश-विदेशात अनेक प्रतिष्ठित मंचांवर सादरीकरण केले आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मालिनी अवस्थी या ‘भारताची लोकसंगीतराणी’ म्हणून ओळखल्या जातात. दादरा, ठुमरी, कजरी, चैती यांसारख्या हिंदुस्थानी संगीत प्रकारांबरोबरच गजल आणि सुफियाना कलाम सादर करण्यातील त्यांचे कौशल्य विशेष मानले जाते. लखनौ येथील भातखंडे विद्यापीठातून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून ‘पूरब अंग गायकी’च्या प्रसारासाठी त्या सक्रियपणे कार्यरत आहेत.
या मैफलीत तबल्यावर रामकुमार मिश्रा, हार्मोनियमवर अजय जोगळेकर आणि सारंगीवर फारुख लतीफ खान साथसंगत करणार आहेत. यावेळी महाराष्ट्र ललित कला निधीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त, संतूरवादक पंडित सतीस व्यास यांनी सांगितले की, गुणिदास संगीत सम्मेलनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देशातील विविध शहरांमध्ये दरमहा संगीत मैफिली आयोजित करण्याचा संस्थेचा संकल्प असून, त्याची सुरुवात मुंबईतील ‘पुरब की ठुमरी’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने होत आहे. रसिकांसाठी हा कार्यक्रम एक अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *