वैभववाडीत भाजपामधून आउटगोईंग…! उबाठा सेनेत प्रवेश…!
वैभववाडी : देशात, राज्यात सर्वत्र भाजपामध्ये ‘इनकमिंग’ सुरु असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाला ‘आउटगोईंग’चा फटका बसला असून नेर्ले गावचे सरपंच, उप सरपंच यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह ‘उबाठा’ सेनेत प्रवेश केला आहे.
‘उबाठा’ सेनेचे माजी खासदार  विनायक राऊत, जिल्हा प्रमुख  वैभव नाईक, माजी आमदार  परशुराम उपरकर, युवा सेना जिल्हा प्रमुख  सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. सिंधुदुर्गात आता ‘उबाठा’ सेनेत प्रवेश करण्यास सुरुवात झाल्याचे सांगून आता ‘उलटी गिनती’ सुरु झाल्याची प्रतिक्रिया नाईक यांनी व्यक्त केली आहे.
वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या भाजप पक्षाच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह शेकडो नागरिकांनी काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश  घेऊन पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजप पक्षाला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. शिवसेना नेत्यांनी भगवी शाल घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी बोलताना माजी खासदार राऊत म्हणाले, अनेक संकटे झेलून शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा कोणीही कितीही प्रयत्न केला तरी शिवसेना संपणार नाही.भाजपच्या सत्ता काळात देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्हा एका कुटुंबाच्या हातात आपण दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची अपरिमित हानी झाली असून ड्रग्स, गांजा,दारू यासारख्याअवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे.पालकमंत्र्यांच्या मेहरबानीमुळे गोव्यातील ‘कॅसिनो’ देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु झाला आहे. मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही.वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत आहे. नागरिकांना गॅस, पेट्रोल, डिझेल मिळत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील भाजप  सरकार पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, नेर्ले गावावर सत्ताधाऱ्यांकडून जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला हे कौतुकास्पद आहे. तुमचा निर्णय चुकला असे कधीही तुम्हाला वाटणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची एकहाती सत्ता आहे. परंतु कुठल्या गावाचा सर्वांगीण विकास झाला हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. महागाईच्या प्रश्नावर आपल्याला आंदोलन करावे लागणार आहे असे ते म्हणाले.
सत्ताधारी पक्ष अपयशी ठरतो तेव्हाच त्यांचे त्यांचे कार्यकर्ते  विरोधी पक्षाकडे वळतात. कार्यकर्त्यांना वापरायचे आणि नंतर फेकून द्यायचे असा राणे कुटूंबाचा देखील इतिहास आहे. परंतु आपण आता शिवसैनिक झाला आहात. आपल्याला न्याय देण्याचे काम आम्ही करू असे आश्वासन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिले.
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहेत.सिंधुदुर्गातील अवैध धंदे त्यांना रोखता आले नाहीत.त्यांचे बंधू आमदार निलेश राणे यांनीच जिल्ह्यात अवैध धंदे वाढले असल्याचा आरोप केला आहे.  या पक्षप्रवेशाने नितेश राणे आणि भाजपा विरोधात पहिली ठिणगी वैभववाडीत पडली असून आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचे लोण पसरणार आहे हे निश्चित असा विश्वास युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *