नाल्याच्या रुंदीकरणासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार
कल्याण : कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडखालून संतोषनगर प्रभागातून लोकग्रामकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या नाल्याची रुंदी व उंची वाढविण्याच्या कामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निधी मंजूर केला असला, तरी प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नसल्याने परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. या नाल्यात पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा केरकचरा, प्लास्टिक तसेच झाडांच्या मोठ्या फांद्या अडकून पाण्याचा प्रवाह खोळंबतो. परिणामी पावसाचे पाणी साचून संतोषनगर तसेच परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरत असल्याची समस्या निर्माण होते.
रविवारी दुपारी शिवसेना संपर्क प्रमुख तथा प्रभागाचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते स्वतः नाल्याच्या तोंडाशी खाली उतरून अडकलेला केरकचरा व इतर अडथळे हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाल्यात मोठ्या प्रमाणात झाडांच्या जाड फांद्या अडकून राहिल्याने पाण्याचा प्रवाह पूर्ण क्षमतेने मोकळा होऊ शकला नाही.
यावेळी बोलताना महेश गायकवाड म्हणाले की, “या नाल्याच्या रुंदीकरण व उंची वाढविण्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला असला, तरी काम तातडीने सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी या कामाचा सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.” नाल्याचे रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडूनही करण्यात येत आहे.
0000
