‘ भारत पेट्रोलियम ‘ च्या निवृत्त कर्मचाऱ्याचे बँक अकाऊंट साफ !
१० लाख रुपये लंपास
महानगर गॅस कंपनीच्या नावे फसवणूक
दिवाकर शेजवळ
मुंबई : मालाड ( पूर्व) भागात घडलेल्या सायबर गुन्ह्याच्या एका घटनेत अनोळखी मोबाईल कॉलमुळे भारत पेट्रोलियम कंपनीच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे सेव्हींग अकाऊंट साफ झाले आहे. पंजाब नॅशनल बँकेतील त्याच्या खात्यातून १० लाख ९२ हजार ९९५ रुपये लंपास करण्यात आले आहेत. या फसवणुकीला बळी पडलेल्या फिर्यादीचे नाव शिवाजी महादेव वासनिक ( ७४ वर्षे) असे आहे. ते मालाड ( पूर्व) खडकपाडा येथील सामना परिवार सोसायटीच्या परिसरातील रहिवासी आहेत.
वासनिक यांची फसवणूक करणारा बोगस कॉल केलेल्या इसमाचे नाव अंचीत शर्मा ( मो : +91 9204718472) असे आहे. त्याने महानगर गॅस लि. या कंपनीच्या नावे वासनिक यांना कॉल केला होता. उत्तर विभाग सायबर पोलीस ठाण्याने या प्रकरणात २२ मे २०२६ रोजी तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमके काय घडले?
फिर्यादी शिवाजी वासनिक यांना ते घरी असताना त्यांना दिनांक १८ मे २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता मोबाईलवर एक अनोळखी कॉल आला होता. कॉल करणाऱ्या अंचित शर्मा याने आपण महानगर गॅस लि. या कंपनीचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, तुम्हाला तीन – चार ई मेल केले आहेत. तुमचे गॅस कनेक्शन बंद होवून जाईल. ही शेवटची संधी आहे. तुम्हाला बिल अपडेट करावे लागणार आहे.
तुमच्या महानगर गॅस लि. च्या ॲप मध्ये बिल अपडेट करण्याचा फॉर्म असेल. तो तुम्ही त्वरित अपडेट करावा, असेही शर्मा याने सांगितले. त्यावर शिवाजी वासनिक त्याला म्हणाले की, आमच्या गॅस कनेक्शनचा नंबर मला ठावूक नाही. ते कनेक्शन पत्नीच्या की माझ्या नावे आहे, हे सुद्धा माझ्या लक्षात नाही. तुम्ही मला मेल करावा. माझी माहिती मी मेलवरती पाठवून देतो.
दुसऱ्या दिवशी १५ -२० एसएमएस !
दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ मे २०२६ रोजी दुपारी एक – दीड तासात शिवाजी वासनिक यांना १५ ते २० एस एम एस आले. त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेतील बचत खात्यातून चार टप्प्यात १० लाख ९२ हजार ९९५ रुपये १० पैसे इतकी रक्कम काढून घेण्यात आल्याचे त्या मेसेजेस मधून स्पष्ट झाले आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या अंतर्गत असलेल्या उत्तर विभाग सायबर पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक अमोल कांबळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
तीन अनोळखी इसमांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (२०२३) च्या कलम ६१ (२), ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ( २०००) च्या कलम ६६ (सी ), ६६ ( डी) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनोळखी मोबाईल क्रमांकावरून एसएमएस पाठवून आणि कॉल्स करून मोबाईल धारकांना घाबरवून टाकणारी माहिती देत वैयक्तिक तपशील मागवून त्यांची बँक खाती साफ करणारे सायबर गुन्हे वाढतच चालले आहेत. विशेष म्हणजे, मोबाईल धारकांच्या बँक खात्यावर दरोडा घालणारे बोगस कॉल्स हे बँका, गॅस कंपन्या, वीज कंपन्या, सरकारी उपक्रमांच्या नावे केले जात आहेत. त्यामुळे लोक फसवणुकीला साहजिकच बळी पडत आहेत.
