‘एसआयआर’ मोहिमेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी
मुंबई: राज्यात सुरू झालेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीचा ३१ जुलैपर्यंतचा कालावधी अपुरा आहे. त्यात जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग मिळण्यासाठी त्या मोहिमेला सप्टेंबर अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनीअर्स असोसिशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष कुलदीप रामटेके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. पश्चिम बंगालमधील २७ लाख मतदारांपाठोपाठ ओडिशात २० लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच १७ लाख लोकसंख्या असलेल्या गोवा राज्यातही दीड लाख मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे. बाद करण्यात येणाऱ्या मतदारांची वाढती  संख्या अविश्वसनीय आणि चिंताजनक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी निमित्त संविधान जागर अभियानतर्फे जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून त्यात रामटेके यांचा विशेष पुढाकार आहे. त्या मोहिमेद्वारे ‘एसआयआर’मध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी मतदानाचा अधिकार जपा; लोकशाही बळकट करा, असे आवाहन थेट संपर्कातून केले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ग्रामीण भागात पेरणीच्या कामासाठी शेतकरी आणि शेतमजूर हे गावात घरी सापडत नाहीत. ते शेतावर जातात. त्यामुळे गावात ‘बीएलओ’ आणि त्यांची भेट होणे कठीण आहे, असे कुलदीप रामटेके म्हणाले. खेड्यापाड्यातील गावकरी बांधवांकडे लॅपटॉप, अँड्रॉइड फोन नसतात.
आवश्यक कागदपत्र वेळेवर मिळत नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीपासून ग्रामीण मतदार मोठ्या संख्येने वंचित राहण्याचा आणि यादीतून बाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे सांगत एसआयआर मोहिमेला सप्टेंबर अखेर पर्यंत मुदतवाढ मिळण्याची नितांत गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *