१५० कोटींची गुंतवणूक अपेक्षित…!
मुंबई : मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी बोटी  उपलब्ध करून देणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाज बांधणी  सुविधा विकसित करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे.झोया मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दालनात  हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या सामंजस्य करारानुसार ‘मुंबई वॉटर मेट्रो ‘ प्रकल्पासाठी आवश्यक असलेली आधुनिक व पर्यावरणपूरक बोटी  उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे सुमारे २२ एकर क्षेत्रात  सुमारे १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा  इलेक्ट्रिक बोट बांधणीचा  अत्याधुनिक प्रकल्प  उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात हरित सागरी वाहतुकीला चालना मिळण्यासोबतच जहाजबांधणी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे.
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक बोटी  उपलब्ध करून देण्याबरोबरच सिंधुदुर्गमध्ये इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा उद्योग उभारल्यामुळे राज्याच्या सागरी अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, आधुनिक जहाजबांधणीला चालना मिळेल असा  दावा करण्यात आला आहे. या बैठकीला  परिवहन व बंदरे विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी,महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, मे.झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि.चे संचालक जॉन फर्नांडिस, संचालक सुरज देवाढीया तसेच डॉ.निलेश बाणावलीकर  उपस्थित होते.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *