दिनेश मराठे
मुंबई : दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या बेस्ट बसेस जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरुन सुरु कराव्यात अशी मागणी स्थानिक रहिवाशी माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी केली आहे. या बाबत त्यांनी बेस्ट प्रशासनाला पत्र दिले असून त्यांनी म्हटले आहे की, बस क्र. ६६, ६९, १२६, ८६, ८८ या बेस्ट बसेस पूर्वी जगन्नाथ शंकरशेट मार्ग गिरगांव मार्गे त्यांच्या दक्षिण मुंबई मधील स्थानकाकडे जात होत्या. मेट्रो रेल्वेच्या गिरगांव व काळबादेवी स्टेशनच्या कामामुळे संपूर्ण जगन्नाथ शंकरशेट मार्ग खोदण्यात आला होता. त्यामुळे वरील सर्व बेस्ट बसेस गिरगांव जगन्नाथ शंकरशेट मार्गावरुन न जाता महर्षी कर्वे मार्गावरुन दक्षिण मुंबईकडे वळवण्यात आल्या होत्या. सन २०१७ च्या एप्रिल/मे महिन्यांपासून या बेस्ट बसेसचा मार्ग वरील प्रमाणे बदलण्यात आला होता.
गेल्या वर्षी मेट्रो रेल्वेची दोन्ही स्थानक गिरगांव व काळबादेवी नागरिकांसाठी खुली करण्यात आली पण रस्त्याची कामे मात्र पूर्ण झालेली नव्हती. गेली आठ वर्षहून अधिक काळ गिरगांवकर बसेससाठी एक ते सव्वा किलोमिटर पायपीट करून महर्षी कर्वे मार्ग येथील बस थांब्यावर जात आहेत. आता मात्र संपूर्ण जगन्नाथ शंकरशेट मार्गाचे रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्यामुळे बेस्ट बसेसचा मार्ग पुर्ववत करण्यास कुठलीही आडकाठी नाही. त्यामुळे बेस्ट बसेस पूर्वी प्रमाणे जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरुन दक्षिण मुंबईकडे नेण्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करुन नागरिकांना दिलासा द्यावा.
0000000
