मुळदेत कार्प मत्स्यबीज निर्मितीला वेग…!
कुडाळ : गोडया पाण्यातील मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. हिरालाल चौधरी यांनी १० जुलै १९७० रोजी पहिल्यांदा प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीपणे कार्प मत्स्यबीज निमिर्तीचा प्रयोग साध्य केला. या महान कार्याचा गौरव म्हणून सन- २००१ पासून १० जुलै हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील मत्स्य संशोधन केंद्रामध्ये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धेाडमिसे यांच्या हस्ते कटला जातीच्या नर आणि मादी या माशांना प्रेरक इंजेक्शन देऊन पार पडला. यावेळी मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय दळवी,  मत्स्य प्रकल्पाचे प्रमुख डॉ. कल्पेश शिंदे,  सहाय्यक प्राध्यापक,  डॉ. कृपेश सावंत, सहाय्यक प्राध्यापक, विनय सहस्रबुद्धे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, डॉ.वाघ,  डॉ. शेडगे, डॉ. गावडे आणि मत्स्य प्रकल्पातील कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
उद्यानविदया महाविद्यालय, मुळदे अंतर्गत मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प कार्यान्वित असून येथे गोडया पाण्यातील मत्स्य शेती, शोभिवंत मत्स्य शेती यासंबधी संशोधन कार्य तसेच विस्तार शिक्षण कार्यक्रम राबविले जातात. सिंधुदुर्ग जिल्हयातील गोडया पाण्यातील मत्स्यशेती व शोभिवंत मत्स्यशेतीला विकसित करण्यासाठी  शासनामार्फत राबविल्या जाणा-या  मत्स्यशेतीसंबधीत निधी वितरण योजनाच्या सहाय्याने  विविध प्रकल्प या केंद्रामध्ये राबविण्यात येत आहेत.  या अनुषंगाने गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा विकास होण्याकरीता सुयोग्य आकाराच्या व उत्तम गुणवत्तेच्या कार्प मत्स्यबीजाचे सातत्यपूर्ण उत्पादन करुन मत्स्यबीजाची मागणी व पूरवठा यांमधील दरी भरून काढण्याच्या उद्दिष्टाने सिंधुरत्न समृध्द योजनेंतर्गत कार्प मत्स्यबीज केंद्र स्थापन करणे हा प्रकल्प मुळदे येथे कार्यान्वित करण्यात आला आहे.
याव्दारे निर्माण करण्यात आलेल्या विविध साधनसामग्रीचा विनियोग करुन प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर करुन कटला,रोहू प्रजातीच्या मत्स्यबीजाची निर्मिती करण्यात येते व सदर मत्स्य बीज विविध आकारमानामध्ये संवर्धित करुन मत्स्यशेती करणा-या शेतकऱ्यांना पुरविण्यात येते. यामध्ये प्राधान्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर तसेच याव्यतिरिक्त मागणीनुसार कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमधील शेतक-यांचा समावेश आहे.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *