रमेश औताडे
मुंबई : केंद्रीय रस्तेवाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले असल्याचे मत त्यांच्या कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या पुस्तकांचे लेखक अशोकराव टाव्हरे यांनी व्यक्त केले आहे. सध्या सोशल मिडीयावर इथेनाॅलच्या मुद्द्याबाबत गडकरींवर होत असलेली टीका चुकीची असून इराण – अमेरिका युध्दाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल,डिझेल टंचाई निर्माण होईल अशी परिस्थिती होती, त्यामुळे इथेनाॅलवरील वाहने वाढली पाहिजे या दृष्टीने नितीन गडकरी यांनी वक्तव्य केले होते. सध्या इथेनाॅलमिश्रीत पेट्रोलचा वापर होत आहे, परंतु इथेनाॅलची निर्मिती देशात होत असल्याने या वक्तव्यामागे आत्मनिर्भर भारत या हेतुने पाहिले पाहिजे होते असे टाव्हरे यांनी सांगितले.
नितीन गडकरी हे पंचवीस वर्षे महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य होते, सन २०१४ पासून लोकसभा सदस्य आहेत. ३७ वर्षाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, विधानपरिषद विरोधी पक्षनेते,भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष व बारा वर्षांपासून केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द दैदीप्यमान राहिली आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग खात्यासह त्यांनी काही काळ जहाजबांधणी, जलसंधारण, नदी विकास, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या विभागांची जबाबदारीही सक्षमपणे पार पाडली होती.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व मुंबईतील उड्डाणपूल हे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. देशभरात राष्ट्रीय महामार्गांची वाढ, रस्ते प्रकल्प उभारणीतून होत असलेला पायाभूत सुविधांचा विकास, अनेक द्रुतगती महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे देशासाठी मोठे योगदान दिलेल्या गडकरींवर सोशल मिडीयावर सुरू असलेली मोहीम चुकीची असल्याचे अशोकराव टाव्हरे यांनी नमुद केले आहे.
