प्रा. विसुभाऊ बापट घेऊन येताहेत आपला ३१५० वा महोत्सवी प्रयोग
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज, जनाबाई पासून बहिणाबाई चौधरी पर्यंत आणि कुसुमाग्रज, विं. दा. करंदीकर, मंगेश पाडगांवकर, वसंत बापट यांच्या पासून ना. धों. महानोर, रामदास फुटाणे यांच्या पर्यंत अनेक कवींच्या काव्यरचना मुखोद्गत असलेल्या आणि आपल्या अभिनयसंपन्न एकपात्री प्रयोगांचा एकापाठोपाठ एक असे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या प्रा. विसुभाऊ बापट यांच्या ‘कुटुंब रंगलंय काव्यात’चा ३१५०वा महोत्सवी प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विद्यमाने सोमवार, २० जुलैला  आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजतां दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात हा रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवणारा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’चा प्रयोग प्रा. विसुभाऊ बापट हे सादर करणार आहेत. त्यांना पवित्र सावंत हे तबल्यावर साथ करणार आहेत तर तालवाद्याची रंगत डॉ. किशोर खुशाले हे आणणार आहेत. तमाम कविता प्रकारांचा काव्य गीत गायन आणि साभिनय सादरीकरणाने नटलेला ‘विश्वविक्रमी’ जागतिक एकपात्री काव्यनाट्यानुभवासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संचालक श्रीराम पांडे यांनी तमाम रसिक श्रोत्यांना आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे हा काव्यनाट्यानुभव विनामूल्य असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारा सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *