कल्याण : कल्याणच्या खडकपाडा येथील केएफसीमधील आऊटलेटमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा ठपका अन्न व औषध प्रशासन विभागाने ठेवला आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण मंचचे जिल्हा संघटक प्रथमेश पुण्यार्थी यांनी एका व्हिडीओद्वारे येथील केएफसी आऊटलेटबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी खाद्य पदार्थांचे स्टोरेज एकत्र ठेवणे, ग्राहकांना खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची माहिती न देणे यांसह एकूण नऊ गंभीर त्रुटी आढळून आल्या.
केएफसी स्टोअर, खडकपाडा येथे अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे पुण्यार्थी यांच्या निदर्शनास आले. या स्टोअरमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांसाठी वापरण्यात येणारे पाव  हे स्टोअरच्या मागील बाजूस शौचालयाजवळ तसेच कचऱ्याच्या पेट्या आणि घाणीच्या ठिकाणी ठेवले जात असल्याचे दिसून आले आहे. अशा अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ ठेवणे हे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असून, त्यामुळे अन्न दूषित होण्याची गंभीर शक्यता निर्माण होते.
या संदर्भात पुण्यार्थी यांनी अन्न व औषध प्रशासनाला पत्र देत संबंधित केएफसी स्टोअरची तात्काळ तपासणी करून योग्य कार्यवाही करून दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने मे. सफायर फूड्स इंडिया लिमिटेड (केएफसी) या आस्थापनेची FosCos प्रणालीवर ऑनलाईन सखोल तपासणी करण्यात आली आहे. तपासणी अहवालातील त्रुटींच्या अनुषंगे संबंधित आस्थापनेला अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कलम ३२ अन्वये सुधारणा नोटीस पाठविण्यात येतअसून  सुधारणा नोटीसच्या अनुषंगे पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *