केंद्र सरकारला माकपचे आवाहन
अनिल ठाणेकर
ठाणे : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुंग यांच्या आंदोलनाचा आज अठरावा दिवस असून, त्यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अर्थात माकपने केली आहे. माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सलग १८ दिवसांच्या उपोषणामुळे सोनम वांगचुंग यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होत असून, त्यांच्या काही सहआंदोलकांची प्रकृतीही चिंताजनक बनली आहे. त्यामुळे आंदोलकांचा जीव धोक्यात येण्यापूर्वी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्याशी चर्चा करावी आणि आंदोलनावर मार्ग काढावा.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या मागण्या योग्य असून, लोकशाही व्यवस्थेत अशा मागण्यांची दखल घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करावे. डॉ. नवले यांनी युवक व विद्यार्थ्यांनाही आवाहन करताना सांगितले की, सोशल मीडियावर आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देणाऱ्या युवकांनी आता प्रत्यक्ष लोकशाही आंदोलनात सहभागी होऊन सोनम वांगचुंग यांच्या मागण्यांना बळ द्यावे. दरम्यान, माकपने केंद्र सरकारला आंदोलनाची गंभीर दखल घेऊन आंदोलकांचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *