कल्याण : जुन्या वादातून चाकूने बारा ते तेरा वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात घडली आहे. कल्याणच्या आडीवली परिसरात मध्यरात्री हि धक्कादायक हत्याकांडाची घटना घडली आहे. यामध्ये अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाईंची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. अर्जुनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून त्याच्या मैत्रिणीवर देखील वार केले असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
कल्याण आडीवली परिसरात राहणारा अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या हा आपल्या मैत्रिणीसह मध्यरात्री उद्यानासमोर बोलत होता. याच दरम्यान त्याच्याशी काही महिन्यापूर्वी वाद झालेला अविनाश झा आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी आला. या दोघांचा पुन्हा त्याच ठिकाणी वाद झाला व या वादातून अविनाश झा आणि त्याच्या साथीदाराने अर्जुन वर धारदार शस्त्राने हल्ला केला. अर्जुन उर्फ पेंद्या मैत्रीण देखील या हल्ल्यात जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अर्जुन याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अविनाश झा आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.
