००००००००००००
कल्याण : डोंबिवली पूर्व पश्चिमेतील स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होते. चुकीच्या पद्धतीने वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्या वाहनांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन सुरु करण्याची मागणी माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त आणि डोंबिवलीच्या विभाग प्रमुखांकडे ही मागणी करण्यात आली आहे. टोईंग व्हॅन सुरु होण्याच्या दृष्टीने संबंधित टेंडर प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी याकडे माजी नगरसेवक धात्रक यांनी लक्ष वेधले आहे. शहरातील बहुतांश रस्ते अरुंद आहेत. अशा परिस्थितीत अनेक वाहनचालक सार्वजनिक रस्त्यांवर, चौकांमध्ये, फूटपाथ लगत तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करतात. विशेषतः डोंबिवली पूर्व आणि पश्चिम स्टेशन परिसरात दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने मनमानीपणे पार्क केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्याचा त्रास वाहनचालकांसह सामान्य नागरीकांना सहन करावा लागतो.
वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस अडकून पडतात. अशा वाहन चालकांच्या विरोघात टोईंग व्हॅनद्वारे वाहतूक पोलिस कारवाई करीत होते. ही टोईंग व्हॅन बंद आहे. त्याची निविदा प्रक्रिया राबविलेली नाही. या प्रकरणी लवकर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक धात्रक यांनी वाहतूक पोलिसांना दिला आहे.
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *