पावसाळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी
अविनाश उबाळे
ठाणे : पावसाळा मोसम सूरु होताच सहयाद्रीच्या उंच पर्वत रांगेतील माळशेज घाटातील डोंगर माथे,हे हिरवेगार दिसतात जशी काय डोंगरांनी हिरवी शाल परिधान केल्याचा भास होतो.आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच डोंगर माथ्यावरुन खोसळणारे धबधबे व रिपरिप पाऊस व पांढऱ्याशुभ्र धुक्यात दिसेनासे होणारे डोंगर जणू काही आकाशातील ढग जमिनीवर उतरल्याचा भास आपणास होतो.चहूबाजूने दिसणारी हिरवीगार वृक्षांची रांग आणि पावसाळ्यातील गडद पांढऱ्या धुक्यांचा खेळ आणि धुक्यांत हरविलेल्या वाटा असा अद्वभूत नजरा प्रत्यक्ष अनुभवयाचा असेल तर पावसाळ्यात माळशेज घाटाची सफर करायलाच हवी असं हे माळशेज घाट सध्या पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ घालत आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगर पुणे या मार्गावर माळशेज घाट लागतो उंच डोंगर माथे,घनदाट असं जंगल,दुर्मिळ वन्यप्राणी,पशुपक्षी, यांचा मुक्त संचार घाटातील नागमोडी रस्ते वृक्षांची सभोवताली दिसणारी रांग,उंच डोंगर माथे व खोल दऱ्या,पक्षांचा किलबिलाट पांढऱ्या शुभ्र गडद दाट धुक्यांत लपलेले डोंगर आणि धुकं व पाऊस यांचा शिवाशिवीचा खेळ रस्त्याकडेला मुक्तपणे संचार करणारी वानरं हा सारा अनमोल ठेवा माळशेज घाटात आहे.पावसाळ्यात तर येथील धबधब्यांत चिंब भिजण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे येतात पावसाळ्या मोसमात पर्यटकांनी माळशेज घाटाल विशेष अशी पसंती दिली आहे.निसर्गाची मजा लुटण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची पावले माळशेज घाटाकडे वळत आहेत. मुंबई ,ठाणे,कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ,बदलापूर,डोंबिवली,शहापूर ,मुरबाड, कर्जत,नगर पुणे,नाशिक,या भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात माळशेज घाटात सहलीसाठी येत असतात घाटात येणाऱ्या पर्यटकांना सर्वप्रथम दर्शन होतं ते इथल्या जंगली वानरांचं रस्त्यावर घाटात वानरांचे तांडेच तांडेच येथे पहावयास मिळतात माळशेज घाटातील ही अनोखी सफर करताना निसर्गाच्या जवळ गेल्याचा एक विलक्षण अविस्मरणीय आनंद मिळतो असे शहापूरचे पर्यटक गजानन वरकुटे यांनी बोलतांना सांगितले.माळशेज घाटा जवळील स्थानिक आदिवासी येथे आवळे,रानभाज्या,विकतांना नजरेस पडतात तर घाटात गरमागरम चहा,वडापाव,भाजलेले कणीस, विक्रीतुन स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो आहे हे विशेष आहे .
माळशेज घाटात जायचे कसे –
माळशेज घाटात जाण्यासाठी खाजगी वाहनाने अथवा कल्याणहून आळेफाटा,नगर,पुणे या परिवहनच्या एसटी बसने जाता येते पर्यटकांना राहण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाचे रेस्टॉरंट व येथे निवासस्थांन उपलब्ध आहेत.तसेच येथे भोजनासाठी असंख्य लहान मोठे हॉटेल व ढाबे मुरबाड,सरळगाव,टोकावडे,व माळशेज घाटा पर्यंत रस्त्याकडे ला पाहण्यास मिळतात.
